आरोग्य : प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी पिता का, मग हृदयासाठी ही बातमी नक्की वाचा, संशोधनातून समोर आली धक्कादायक माहिती - टॉप न्यूज मराठी

रोज ऑफिसला, कॉलेजला किंवा जिमला जाताना आपण प्लास्टिकच्या बाटलीतून पाणी घेऊन जातो. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच प्लास्टिकची बाटली वापरतात. पण ही सवय हृदयासाठी धोकादायक ठरू शकते, असे एका नवीन संशोधनातून समोर आले आहे.

इटलीमधील संशोधकांनी केलेल्या अभ्यासात धक्कादायक माहिती मिळाली आहे. अनेक लोकांच्या रक्तवाहिन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचे छोटे छोटे कण सापडले आहेत. हे कण पाच मिलिमीटरपेक्षा ही लहान असतात. 304 रुग्णांवर केलेल्या तपासणीत निम्म्याहून जास्त रुग्णांच्या धमन्यांमध्ये प्लास्टिकचे कण आढळले. हे कण मान, चेहरा आणि मेंदूला रक्त पुरवठा करणाऱ्या मुख्य रक्तवाहिन्यांमध्ये जमा झाले होते.

या कणांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये जळजळ होते. हळूहळू रक्तवाहिन्यांचे आवरण खराब होते. त्यामुळे ब्लॉकेजचा धोका वाढतो. पुढील तीन वर्षात हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका 4.5 पटीने वाढू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा असलेल्या लोकांसाठी हा धोका आणखी जास्त आहे.

एका लिटरच्या प्लास्टिक बाटलीत सरासरी 2 लाख 40 हजार प्लास्टिकचे कण असतात, असे अभ्यासात सांगण्यात आले आहे. क्लिंग फिल्ममध्ये गुंडाळलेली फळे, भाज्या आणि समुद्रातील मासे यामधूनही हे कण शरीरात जातात.

त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीऐवजी स्टील किंवा काचेची बाटली वापरा. प्लास्टिकच्या डब्यात अन्न गरम करू नका. भाज्या थेट बाजारातून घ्या. छोटी काळजी घेतली तर हृदयाचे मोठे आजार टाळता येतील.