मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा मेल आला आहे. यावेळी एक दोन नव्हे तर पाच महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले आहे. महापौर कार्यालय, मुंबईतील बँक, कोर्ट, अमिताभ बच्चन यांचा बंगला, महालक्ष्मी रेसकोर्स आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ उडवून देण्याची धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे.
हा मेल आज सकाळी 10.12 वाजता आला. त्यानंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या. महापालिका कार्यालयात बॉम्ब शोधक पथकाने तपासणी केली. मात्र कुठेही संशयास्पद वस्तू आढळली नाही. त्यामुळे कार्यालयातील नेहमीचे कामकाज सुरू आहे.
धक्कादायक बाब म्हणजे अशा प्रकारचा मेल येण्याची ही तिसरी वेळ आहे. दोन आठवड्यांपूर्वीही असाच मेल आला होता. मेलमध्ये खलिस्तान बोलेगा, मुंबई जिंदाबाद असा मजकूर लिहिला असल्याची माहिती समोर आली आहे.
हा मेल नेमका कुठून आला, याचा तपास मुंबई पोलीस करत आहेत. वारंवार येणाऱ्या धमकीच्या मेलमुळे सुरक्षा यंत्रणांसमोर आरोपीला शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे.