सोलापूरमध्ये शिकाऊ विमान धावपट्टीवरून घसरले, महिला वैमानिक सुखरूप - टॉप न्यूज मराठी

सोलापूर : सोलापूर विमानतळावर गुरुवारी एका शिकाऊ विमानाचा अपघात झाला. टेक ऑफ करत असताना विमान धावपट्टीवरून घसरून खाली गेले. सुदैवाने यात शिकाऊ महिला वैमानिकाला कोणतीही दुखापत झाली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, शिकाऊ वैमानिक विमानाचे उड्डाण करण्याचा प्रयत्न करत होती. त्याचवेळी विमानाचे नियंत्रण सुटले आणि विमान धावपट्टी सोडून बाजूला गेले. घटनेची माहिती मिळताच विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. वैमानिकाला बाहेर काढण्यात आले. विमानाचे किरकोळ नुकसान झाले आहे.

या घटनेमुळे विमानतळावर काही वेळ गोंधळाचे वातावरण होते. विमानतळ प्राधिकरणाकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. अपघात नेमका कशामुळे झाला, याची चौकशी सुरू आहे.

गेल्या काही दिवसांत बारामती विमानतळावरही दोन विमान अपघात झाले होते. यापूर्वी अहमदाबादमध्ये झालेल्या भीषण अपघातात 260 जणांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे छोट्या विमानतळांवरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.