कॅनडामध्ये एक अतिशय धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ब्रिटिश कोलंबिया या प्रांतातील दुर्गम भागात एका आई आणि तिच्या तरुण मुलीचा ग्रिझली अस्वलाच्या हल्ल्यात जीव गेला आहे. ही घटना इतकी भयंकर होती की, त्यानंतर वन्यजीव विभागाला थेट चार अस्वलांना ठार करण्याचा निर्णय घ्यावा लागला. या घटनेमुळे कॅनडासह जगभरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं
मिळालेल्या माहितीनुसार, 48 वर्षांची जेनी बाल्कारस आणि तिची 20 वर्षांची मुलगी सेला रीड या दोघी ब्रिटिश कोलंबिया प्रांतात फिरायला गेल्या होत्या. वॅनकुव्हर शहरापासून जवळपास 1000 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका निर्जन आणि जंगल असलेल्या भागात त्या होत्या. याच ठिकाणी त्यांच्यावर ग्रिझली अस्वलांनी हल्ला केला. हल्ल्यानंतर दोघींचा शोध घेण्यात आला, तेव्हा त्यांचे मृतदेह त्या दुर्गम भागात आढळून आले. या घटनेने स्थानिक प्रशासनही हादरून गेले.
DNA तपासणीत धक्कादायक माहिती समोर
या हल्ल्यानंतर वन्यजीव अधिकाऱ्यांनी तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळावरून मिळालेल्या नमुन्यांची DNA तपासणी करण्यात आली. या तपासणीत एक मोठा खुलासा झाला. या हल्ल्यात एकच अस्वल नव्हे, तर एका मादी ग्रिझली अस्वलासह तिची तीन पिल्ले सहभागी होती. ही पिल्ले सुमारे एक वर्षांची असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच एकूण चार अस्वलांनी मिळून हा हल्ला केला होता. अधिकाऱ्यांच्या मते, हा हल्ला अचानक घाबरून किंवा स्वतःच्या बचावासाठी केलेला नव्हता, तर तो शिकारीच्या उद्देशाने केलेला असण्याची शक्यता जास्त आहे.
चारही अस्वलांना का मारण्यात आलं
हल्ल्यात सहभागी असलेल्या अस्वलांचा शोध घेतल्यानंतर ब्रिटिश कोलंबिया कन्झर्व्हेशन ऑफिसर सर्व्हिसने एक मोठा निर्णय घेतला. या चारही अस्वलांना ठार करण्यात आले. अनेकांना हा निर्णय कठोर वाटू शकतो, पण अधिकाऱ्यांनी त्यामागचे कारणही सांगितले आहे. एकदा माणसावर जीवघेणा हल्ला केलेले अस्वल पुन्हा देखील हल्ला करू शकते. अशा अस्वलांना दुसरीकडे हलवणे किंवा जंगलात सोडणे हे तिथल्या लोकांसाठी खूप धोकादायक ठरले असते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घ्यावा लागला, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
हिवाळ्याआधी अस्वल का होतात जास्त धोकादायक
या घटनेनंतर अनेकांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला आहे, तो म्हणजे हिवाळ्याआधी अस्वल एवढी आक्रमक का होतात. याबाबत तज्ज्ञांनी माहिती दिली आहे. हिवाळ्यात ग्रिझली अस्वल महिनोनमहिने झोपतात, याला हायबरनेशन असे म्हणतात. या काळात त्यांना अन्न मिळत नाही. त्यामुळे झोपण्याआधी ते आपल्या शरीरात भरपूर चरबी साठवून ठेवतात. यासाठी त्यांना नेहमीपेक्षा जास्त अन्नाची गरज असते. अन्नाच्या शोधात ते जास्त हिंसक आणि आक्रमक होतात. त्यामुळे या काळात माणसांनी जंगलात जाताना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.
या भागात आधीही झाला होता अस्वलाचा हल्ला
विशेष म्हणजे ज्या भागात ही घटना घडली, तिथे याआधीही अस्वलाच्या हल्ल्याची घटना घडली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात याच परिसरात एका अस्वलाने शाळेतील मुलांच्या गटावर हल्ला केला होता. त्या हल्ल्यात लहान मुलांसह 11 जण जखमी झाले होते. मात्र, त्या जुन्या घटनेतील अस्वल आणि सध्याच्या घटनेतील अस्वल वेगवेगळी असल्याचे वन्यजीव अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दोन्ही घटनांचा एकमेकांशी कोणताही संबंध नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने स्थानिक नागरिकांना आणि पर्यटकांना जंगलात एकटे न जाण्याचा इशारा दिला आहे. जंगलात जाताना गटाने जाणे, आवाज करणे आणि अस्वलांपासून बचाव करण्यासाठी आवश्यक साहित्य सोबत ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे.