मनोरंजन विश्व : रामायण पार्ट वन बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ, पहिल्याच दिवशी कोट्यवधींची कमाई, पण सुमंत्रचा रोल का कापला, अभिनेत्याने सांगितली आतली गोष्ट - टॉप न्यूज मराठी

मनोरंजन विश्व : नितेश तिवारी यांचा बहुप्रतिक्षित चित्रपट रामायण पार्ट वन अखेर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे आणि प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त घोडदौड सुरू केली आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, हाऊसफुल्ल शो आणि सोशल मीडियावर सुरू असलेली चर्चा यामुळे रामायण हा सध्या सगळ्यात मोठा चित्रपट ठरला आहे. या चित्रपटात रणबीर कपूरने प्रभू श्रीरामाची भूमिका साकारली आहे, तर साई पल्लवीने माता सीताची भूमिका केली आहे. रवी दुबेने लक्ष्मणाची भूमिका साकारली आहे, काजल अग्रवालने मंदोदरीची भूमिका केली आहे, लारा दत्ताने कैकयीची भूमिका साकारली आहे, राजा दशरथाची भूमिका अरुण गोवील यांनी साकारली आहे आणि रकुल प्रीत सिंगने शूर्पणखाची भूमिका केली आहे. मुख्य कलाकारांना सर्वत्र प्रशंसा मिळत आहे आणि सहाय्यक पात्रांची निवडही उत्कृष्ट झाल्याचे बोलले जात आहे. मात्र याच चित्रपटातून एका महत्वाच्या पात्राचे सीन पूर्णपणे कापण्यात आल्याने आता नवी चर्चा सुरू झाली आहे.

हे पात्र होते सुमंत्र. रामायणात सुमंत्र हे राजा दशरथाच्या आठ राजनैतिक मंत्र्यांपैकी एक होते. त्यांनीच प्रभू राम, सीता आणि लक्ष्मण यांना वनवासानंतर आपल्या रथातून अयोध्येपासून गंगेच्या काठापर्यंत पोहोचवले होते. नमित मल्होत्रा यांच्या रामायणमध्ये सत्येन चतुर्वेदी यांनी सुमंत्राची भूमिका साकारली होती. मात्र सिनेमातून त्यांचे सर्व सीन कट करण्यात आले आहेत. यावर सत्येन चतुर्वेदी यांनी स्वतः खुलासा करताना म्हटले आहे की, रामायण या चित्रपटातून माझे सीन कट केले गेले आहे. या प्रोजेक्टचा भाग होण्याची संधी दिल्याबद्दल संपूर्ण टीमचे आभार. एखादा अभिनेता चित्रित करत असलेले सर्वच सीन सिनेमातून काढून टाकणे हे आमच्या कलाकारांचे आयुष्य आहे. त्यांनी या निर्णयावर कोणताही आरोप केला नाही, पण आपली निराशा मात्र लपवली नाही. त्यांनी चित्रीकरण पूर्ण केले होते, तरीही अंतिम कटमध्ये त्यांचा एकही सीन ठेवण्यात आला नाही.

सत्येन चतुर्वेदी हे हिंदी चित्रपट आणि मालिकांमधील ओळखीचे नाव आहे. त्यांनी आजपर्यंत अनेक चित्रपट, वेब सीरिज आणि नाटकांमध्ये काम केले आहे. चरित्र भूमिका आणि सहाय्यक भूमिकांमधून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सुमंत्रसारखी ऐतिहासिक आणि भावनिक भूमिका मिळणे, हे त्यांच्यासाठी खूप मोठे होते. कारण सुमंत्र हे फक्त मंत्री नव्हते, तर दशरथाचे विश्वासू सारथी आणि रामाचे संकटातील साथीदार होते. रामाला वनवासात सोडून परत येताना सुमंत्राचे दुःख, त्यांचा त्याग आणि त्यांची निष्ठा, हा रामायणातील सर्वात हळवा प्रसंग मानला जातो. त्यामुळे प्रेक्षकांनाही हा सीन पडद्यावर पाहायचा होता.

रामायण चित्रपटाचे एकूण तीन भाग येणार आहेत. निर्मात्यांनी या चित्रपटासाठी तब्बल 4000 कोटींचे बजेट ठेवले आहे. VFX आणि अॅनिमेशनमुळे सगळे पडद्यावर अतिशय भव्य पाहायला मिळत आहे. भाग 1 च्या शेवटी अभिनेता राघव जुयलची झलक पाहायला मिळाली. राघव हा रावणाचा मुलगा मेघनादची भूमिका साकारत आहे. भाग 1 मध्ये जरी त्याची भूमिका जास्त नसली, तरी भाग 2 मध्ये त्याची भूमिका मोठी असणार आहे. भाग 2 मध्ये यश यांनी रावणाची भूमिका साकारल्याचे पाहायला मिळणार असून सनी देओल हे हनुमानाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे भाग 2 ची उत्सुकता आत्तापासूनच शिगेला पोहोचली आहे. भाग 2 हा दिवाळी 2027 मध्ये प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर येत आहे.