कृषी : दुष्काळी परिस्थितीत पाच हजारांची अग्रीम मदत शेतकऱ्यांसाठी ठरली दिलासादायक, शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त - टॉप न्यूज मराठी

कृषी : यंदा एल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने राज्यातील अनेक भागांत दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पिकांच्या पंचनाम्यांच्या आधारे पात्र शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांच्या बँक खात्यांत मदतीची रक्कम जमा करण्यात आली. ऐन सणासुदीच्या काळात मिळालेल्या या आर्थिक आधारामुळे शेतकऱ्यांना दैनंदिन गरजा भागविण्यासाठी तसेच शेतीशी संबंधित खर्चासाठी काही प्रमाणात हातभार मिळाला आहे.

बारामती तालुक्यातील उंबरवाडी मोडवे येथील शेतकरी नवनाथ नानासाहेब बालगुडे यांनी दुष्काळी पंचनाम्यानंतर पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाल्याचे सांगितले. तसेच सदोबाची वाडी येथील शेतकरी सुरेश दत्तात्रय सूर्यवंशी यांनी कमी पावसामुळे सोयाबीनचे पीक हातातून गेल्याचे नमूद केले. पिकांचे पंचनामे पूर्ण झाल्यानंतर खात्यात पाच हजार रुपयांची मदत जमा झाल्याने आर्थिक अडचणीच्या काळात काही प्रमाणात आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथील शेतकरी किसन राखमाजी लोंढे यांनाही दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत मिळाली. कमी पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत ही मदत वेळेत मिळाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.

दौंड तालुक्यातील बोरी पारधी येथील शेतकरी संतोष अरुण ताडगे यांनी यंदा बाजरीची पेरणी केली होती. मात्र, पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने पिकाचे नुकसान झाले. अशा परिस्थितीत शासनाच्या निर्णयानुसार पाच हजार रुपयांची अग्रीम मदत त्यांच्या खात्यात जमा झाली. अडचणीच्या काळात वेळेत मदत मिळाल्याने दिलासा मिळाल्याचे त्यांनी सांगितले.

मका पिकाच्या दुष्काळामुळे झालेल्या नुकसानीचे ५ हजार रुपये मला मिळाले असून उर्वरित नुकसान रक्कमही लवकर मिळावी, अशी अपेक्षा बारामती तालुक्यातील पिंगळेवस्ती येथील शेतकरी राजेंद्र मारुती पिंगळे यांनी व्यक्त केली.

वेळेवर मदतीमुळे सणासुदीच्या काळात आर्थिक आधार

कमी पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी पाच हजार रुपयांची अग्रीम मदत ही अडचणीच्या काळातील महत्त्वाची मदत ठरली आहे. दिवाळीपूर्वीच ही रक्कम खात्यात जमा झाल्याने सणासुदीच्या काळातील खर्चासाठी शेतकऱ्यांना हातभार मिळाला. दुष्काळी परिस्थितीमुळे निर्माण झालेल्या आर्थिक अडचणींची तीव्रता काही प्रमाणात कमी करण्यास या मदतीचा उपयोग झाला. पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी वेळेत मदत मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.