मराठवाड्यातील कुटुंबांची दिवाळी गोड होणार, माधुरी मिसाळ यांच्या हस्ते लाडू-चिवड्याच्या गाड्या रवाना, धाराशिव, उमरगा, परभणीत वाटप - टॉप न्यूज मराठी

पुणे : दुष्काळाच्या संकटाला सामोरे जाणाऱ्या मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातील गरजू कुटुंबांची दिवाळी गोड व्हावी, या सामाजिक बांधिलकीतून दि पूना मर्चंट्स चेंबर्सतर्फे लाडू आणि चिवड्याचे वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत लाडू-चिवडा घेऊन जाणाऱ्या गाड्या गुरुवारी, 5 नोव्हेंबर रोजी नगरविकास राज्यमंत्री तथा पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांच्या हस्ते चेंबर्सच्या कार्यालयातून रवाना करण्यात आल्या. शुक्रवारी, 6 नोव्हेंबर रोजी या फराळाचे लाभार्थी कुटुंबांना सन्मानपूर्वक वितरण करण्यात येणार आहे.

यावेळी माधुरी मिसाळ म्हणाल्या, दिवाळी हा आनंद, प्रकाश आणि एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होण्याचा सण आहे. मात्र, दुष्काळामुळे अनेक कुटुंबांना सण साजरा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत पूना मर्चंट्स चेंबर्सने सामाजिक बांधिलकी जपत मराठवाड्यातील गरजू कुटुंबांपर्यंत दिवाळीचा आनंद पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे, ही अत्यंत कौतुकास्पद बाब आहे. समाजातील सक्षम घटकांनी गरजूंच्या मदतीसाठी पुढे येणे आवश्यक आहे. अशा उपक्रमांमुळे सामाजिक एकोपा आणि माणुसकीची भावना अधिक दृढ होते.

धाराशिव जिल्ह्यातील राघुचीवाडी हे गाव दुष्काळामुळे मोठ्या अडचणीत सापडले आहे. या गावातील बहुतांश कुटुंबे मजुरी करून उदरनिर्वाह करतात. आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील या कुटुंबांना सध्या मदतीची गरज आहे. त्यामुळे राघुचीवाडी गावातील कुटुंबांना दिवाळीनिमित्त लाडू आणि चिवड्याचे वाटप करण्यात आले. धाराशिव परिसरातील आदिवासी, वंचित कुटुंबातील पालावरच्या शाळेतील विद्यार्थ्यांना पॅकेट्सचे वाटप करण्यात आले. तसेच उमरगा येथेही लाडू-चिवडा पाठविण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यातील मानवत तालुक्यातील सावरगाव येथील गरजू कुटुंबांनाही लाडू आणि चिवड्याचे वाटप केले जाणार आहे.

स्थानिक तलाठी, ग्रामसेवक, शासकीय कर्मचारी, पोलीस अधिकारी, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच तहसीलदार यांच्या उपस्थितीत गरजू कुटुंबांना आणि विद्यार्थ्यांना लाडू-चिवडा वाटप करण्यात येणार आहे.

या प्रसंगी चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया, सचिव ईश्वर नहार, सहसचिव आशिष दुगड, माजी अध्यक्ष रायकुमार नहार, राजेश शहा, दिपक बोरा, प्रविण चोरबेले, कार्यकारिणी सदस्य नवीन गोयल, उत्तम बाठिया, दिनेश मेहता, संदिप शहा, प्रकाश नहार, सुहास दोशी, शाम लड्डा, हरिराम चौधरी व सभासद बंधू उपस्थित होते.

चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया म्हणाले, संकटकाळात मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे. चेंबर्सने नेहमीच प्रथम प्रतिसाद देत गरजूंच्या मदतीला धावून जाण्याची परंपरा जपली आहे. यंदाही मराठवाड्यातील आपल्या बांधवांसाठी तेच कार्य पुढे सुरू ठेवले आहे.

गरजू कुटुंबांना मदत करताना त्यांच्या स्वाभिमानाचा आणि सन्मानाचा विचार केला जात असल्याचेही बाठिया यांनी स्पष्ट केले.

या सामाजिक उपक्रमासाठी चेंबर्सचे सभासद आणि देणगीदार यांनी उत्स्फूर्तपणे योगदान दिले आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सर्वांचे मनःपूर्वक आभार मानले.