कव्हर स्टोरी : टोरेंटच्या प्रकल्पासाठी एकही झाड तोडू दिलं जाणार नाही. कुणी झाडं तोडायला आले तर तो कोरोनापेक्षा भयंकर रोग आहे असं समजा आणि हातात ताटं-वाट्या घेऊन वाजवत त्यांना हाकलवून लावा. सह्याद्री हा जगातले एक मोठं आश्चर्य आहे. अशा पद्धतीने पशु-पक्षांच्या घरावर बॉम्ब टाकून, त्यांना उध्वस्त करून आपण काय साध्य करतोय. टोरेंट कंपनीच्या प्रकल्पासाठी यापुढे कर्जत-भिमाशंकरमध्ये एकही झाड तोडू देणार नाही. विकासाच्या नावावर जमिनी घेतल्या तर तिथल्या पुढच्या पिढ्या भिकेला लागतील. यापुढे एकही झाड तोडू देऊ नका नाहीतर विकास संपलेला आहे असं समजा. यामध्ये एकही झाड न तोडता हा प्रकल्प करावा, आमचा त्याला विरोध नाही. जगात फक्त १८ टक्के जंगलं शिल्लक आहेत. ते आपल्याला ३३ टक्के करणे आवश्यक आहे. पण ते वाढवण्याऐवजी ही झाडं तोडली जात आहेत. शेकरू हा राज्यप्राणी हा भिमाशंकर अभयारण्यामध्ये आहे. पण आपण फक्त भिमाशंकर अभयारण्यामध्येच राहायचं, बाजूच्या कर्जतमध्ये जायचं नाही ही सीमा त्याला कशी समजणार? पशुपक्षांच्या घरावर बॉम्ब टाकून, त्यांना उद्ध्वस्त करून आपण काय साध्य करतोय? शंभर-दीडशे वर्षांपूर्वीची झाडं तोडून आपण काय करतोय?
टोरेंटसारखा एकही प्रकल्प आम्हाला नको. त्यासाठी कोणतीही झाडं तोडायला नकोत. जी जुनी पर्यावरणाची व्यवस्था आहे त्याला हात न लावता हे प्रकल्प करा. पर्यावरण नष्ट करण्यासाठी तुम्हाला निवडून दिलं का? आहे ती मोठी झाडं तोडू नका, हीच आमची मागणी आहे. सेव्ह सह्याद्री अशी एक संघटना तयार करतोय. त्यामध्ये एक लाख मुलं तयार करतोय. त्या माध्यमातून सह्याद्रीमध्ये अशा प्रकारच्या पर्यावरणाचा हास करणाऱ्या प्रकल्पांना आम्ही विरोध करू.
- सयाजी शिंदे