सिंधुदुर्ग : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी घंटानाद आंदोलन छेडले आहे. आपल्या 15 प्रमुख मागण्या शासनाने मान्य कराव्यात यासाठी हे आंदोलन करण्यात आले असून हे आंदोलन तीन टप्प्यात होणार आहे. आज पहिल्या टप्प्यातील घंटानाद आंदोलन राज्यभर राबवण्यात आले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. येथील सर्व आगारातील कर्मचाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. विशेष म्हणजे या आंदोलनामुळे प्रवाशांना कोणताही त्रास होणार नाही किंवा एसटीच्या फेऱ्या बंद होणार नाहीत याची काळजी घेण्यात आली आहे. कामावर राहूनच कर्मचाऱ्यांनी घंटा वाजवत आपला निषेध व्यक्त केला.
काय आहेत मागण्या
मिळालेल्या माहितीनुसार एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढ, महागाई भत्ता, बदली धोरण आणि वैद्यकीय सुविधा यासारख्या 15 मागण्या आहेत. गेल्या अनेक महिन्यांपासून शासनाकडे पाठपुरावा करूनही मागण्या मान्य होत नसल्याने अखेर दिवाळीच्या मुहूर्तावर आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवाळीमध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते. त्यामुळे जर हे आंदोलन चिघळले तर प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. सध्या पहिला टप्पा शांततेत पार पडला असून शासनाने दखल न घेतल्यास पुढील टप्प्यात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
दरम्यान या आंदोलनावर परिवहन विभाग काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.