पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सोमवारी दुपारी त्यांना बारामतीहून पुण्यात आणण्यात आले. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
बारामतीत असताना त्रास जाणवला
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दहा ते बारा दिवसांपासून शरद पवार यांचा दौरा खूप दगदगीचा होता. सततचा प्रवास आणि कार्यक्रमांमुळे थकवा आला होता. बारामतीत असताना त्यांना सर्दी, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास जाणवू लागला. त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि खबरदारी म्हणून पुढील उपचारासाठी पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
डॉक्टरांनी काय सांगितले
रुबी हॉल क्लिनिकचे डॉक्टर अभिजीत लोढा यांनी माध्यमांना माहिती दिली. प्राथमिक तपासणी पूर्ण झाली असून त्यांच्या हृदयाचे ठोके आणि ऑक्सिजन पातळी सामान्य आहे. श्वसनाचा वेग थोडा वाढलेला आहे. छातीत कफ साचल्याने संसर्ग झाला आहे. त्यांना खासगी कक्षात ठेवण्यात आले असून सध्या ऑक्सिजन किंवा व्हेंटिलेटरची गरज नाही. पुढील दोन ते तीन तासात इतर चाचण्यांचे अहवाल येतील त्यानंतर पुढील उपचार ठरवले जातील.
सुप्रिया सुळे यांची माहिती
खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर माहिती दिली आहे की बाबांना चेस्ट कंजेशन झाले आहे आणि त्यांना पाच दिवस अँटिबायोटिक्सचा कोर्स घ्यावा लागणार आहे. सुदैवाने इतर सर्व महत्त्वाचे रिपोर्ट नॉर्मल आहेत. त्यांच्यासोबत पत्नी प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, सदानंद सुळे आणि आमदार रोहित पवार हे रुग्णालयात आहेत.
कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन
रोहित पवार यांनी सांगितले की शरद पवार हे स्वतःच्या खाजगी वाहनाने रुग्णालयात आले. डॉक्टरांनी सर्व चाचण्या केल्या असून रिपोर्ट नॉर्मल आले आहेत. उर्वरित रिपोर्ट आल्यानंतर त्यांना पुण्यातच ठेवायचे की मुंबईला हलवायचे याचा निर्णय कुटुंब घेईल. रुग्णालयात दररोज अनेक रुग्णांवर उपचार सुरू असतात त्यामुळे कार्यकर्त्यांनी रुग्णालय परिसरात गर्दी करू नये आणि इतर रुग्णांना त्रास होईल असे काही करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
शरद पवार यांना यापूर्वीही प्रकृतीच्या कारणामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याने समर्थकांनी काळजी करू नये असे आवाहन पक्षाकडून करण्यात आले आहे.