ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात खरंच कापले होते का? इतिहासाच्या पुस्तकात नसलेले सत्य - टॉप न्यूज मराठी

प्रेमाचे प्रतीक असलेला ताजमहाल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. पण या सुंदर वास्तूमागे एक अतिशय क्रूर आणि भयानक कथा सांगितली जाते. ती म्हणजे ताजमहाल पूर्ण झाल्यावर शहाजहान बादशहाने त्याला बांधणाऱ्या 20 हजार कारागिरांचे हात कापले होते, जेणेकरून ते दुसरा ताजमहाल बांधू शकणार नाहीत. ही गोष्ट आपण लहानपणापासून ऐकत आलो आहोत. पण यामागचे सत्य काय आहे?

ही कथा कुठून आली?

खरे तर कोणत्याही अधिकृत मुघल कागदपत्रांमध्ये, म्हणजेच शाहजहान नामा किंवा त्या काळातील कोणत्याही ऐतिहासिक बखरीत अशा घटनेचा उल्लेख नाही. मुघल काळात प्रत्येक छोट्या मोठ्या घटनेची नोंद ठेवली जात असे. जर 20 हजार लोकांचे हात कापले असते तर त्याची नक्कीच नोंद झाली असती. पण तशी कोणतीही नोंद नाही.

इतिहासकार काय सांगतात?

बहुतेक इतिहासकारांच्या मते ही फक्त एक दंतकथा आहे. त्यामागे काही कारणे दिली जातात.

पहिले कारण म्हणजे ताजमहालचे मुख्य कारागीर उस्ताद अहमद लाहौरी हे ताजमहाल बांधल्यानंतरही अनेक वर्षे जिवंत होते. त्यांनी ताजमहाल नंतर दिल्लीच्या लाल किल्ल्याचेही काम केले होते. जर त्यांचे हात कापले असते तर ते दुसरे बांधकाम करू शकले नसते.

दुसरे कारण म्हणजे त्या काळात कारागीर हे राजाची संपत्ती मानले जात असत. एवढ्या मोठ्या संख्येने कारागिरांचे हात कापणे म्हणजे स्वतःच्याच साम्राज्याचे आर्थिक नुकसान करून घेणे होते. कारण हात कापल्यानंतर ते कारागीर कोणत्याही कामाचे राहिले नसते आणि त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी पुन्हा राजावरच आली असती.

तिसरे कारण म्हणजे ताजमहाल ही एकमेव वास्तू नाही. ताजमहाल नंतरही त्याच शैलीतील अनेक वास्तू भारतात बांधल्या गेल्या. उदाहरणार्थ औरंगाबादमधील बीबी का मकबरा जो ताजमहाल सारखाच दिसतो. तोही त्याच कारागिरांच्या पुढच्या पिढीने बांधला असल्याचे सांगितले जाते.

मग ही अफवा का पसरली?

असे मानले जाते की ब्रिटिश काळात ही अफवा पसरवण्यात आली. ब्रिटिश इतिहासकारांनी मुघल राज्यकर्त्यांना क्रूर आणि अमानवी दाखवण्यासाठी अशा कथा पसरवल्या. जेणेकरून भारतीयांच्या मनात मुघलांबद्दल द्वेष निर्माण होईल आणि ब्रिटिशांचे राज्य चांगले आहे असे वाटेल. युरोपमध्येही अशीच एक कथा आहे की प्रागमधील घड्याळ बनवणाऱ्याचे डोळे फोडण्यात आले होते.

त्यामुळे ताजमहाल बांधणाऱ्या कारागिरांचे हात कापले ही गोष्ट ऐकायला रंजक आणि भयानक वाटते खरी, पण ऐतिहासिक पुराव्यानुसार ती खरी नाही. उलट शहाजहानने कारागिरांना त्यांच्या कामासाठी मोठी बक्षिसे आणि जमिनी दिल्या होत्या, अशी नोंद काही ठिकाणी आढळते.