रंजक रोचक : तुम्ही कधीही कोणत्याही मोठ्या हॉटेलमध्ये गेला असाल, मग ते 3 स्टार असो किंवा 5 स्टार, तिथल्या बेडवर तुम्हाला नेहमी पांढरीच चादर, पांढरेच उशीचे कव्हर आणि पांढरेच टॉवेल दिसतील. कधी विचार केला आहे का, हॉटेलवाले रंगीबेरंगी चादरी का वापरत नाहीत? यामागे फक्त एक नाही तर अनेक मोठी कारणे आहेत.
1. स्वच्छतेचा पुरावा
पांढऱ्या चादरीवर अगदी छोटासा डागही लगेच दिसतो. त्यामुळे ग्राहकाला ती चादर स्वच्छ आहे की नाही हे लगेच कळते. जर चादरीवर एखादा डाग असेल तर तो लपवता येत नाही. त्यामुळे हॉटेलला प्रत्येक वेळी स्वच्छ चादर बदलावीच लागते. यामुळे ग्राहकांचा स्वच्छतेवर विश्वास बसतो.
2. शांत झोपेसाठी
पांढरा रंग डोळ्यांना शांतता देतो. वैज्ञानिकदृष्ट्या पांढरा रंग पाहिल्यावर मन शांत होते आणि झोप चांगली लागते. हॉटेलमध्ये लोक आराम करण्यासाठी आणि चांगली झोप घेण्यासाठी येतात. त्यामुळे पांढरा रंग त्यांना प्रसन्न वाटतो. रंगीबेरंगी डिझाईनमुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
3. लक्झरी आणि श्रीमंतीची भावना
पांढरा रंग हा श्रीमंती, स्वच्छता आणि लक्झरीचे प्रतीक मानला जातो. पूर्वीच्या काळी फक्त श्रीमंत लोकच पांढऱ्या चादरी वापरत असत, कारण त्या स्वच्छ ठेवणे खूप कठीण होते. आजही फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये पांढरी चादर म्हणजे आलिशान सेवेचे प्रतीक आहे.
4. धुण्यासाठी सोपे
हॉटेलमध्ये रोज हजारो चादरी धुतल्या जातात. सर्व चादरी पांढऱ्या असल्यामुळे त्या एकत्रितपणे ब्लीच टाकून धुता येतात. त्यांचा रंग जाण्याची भीती नसते. जर रंगीत चादरी असत्या तर त्यांचे रंग एकमेकांवर लागले असते आणि ब्लीच वापरता आले नसते. त्यामुळे हॉटेलचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचतो.
5. वेस्टिन हॉटेलने सुरू केली परंपरा
सांगितले जाते की, 1990 च्या दशकात वेस्टिन हॉटेल समूहाने पहिल्यांदा आपल्या सर्व हॉटेलमध्ये पांढऱ्या चादरी वापरण्यास सुरुवात केली होती. त्यावेळी त्यांची ही कल्पना इतकी हिट झाली की, पाहुण्यांना असे वाटू लागले की पांढरी चादर म्हणजे चांगले हॉटेल. त्यानंतर जगभरातील सर्व मोठ्या हॉटेल्सनी हीच पद्धत स्वीकारली.
त्यामुळे पुढच्या वेळी हॉटेलमध्ये गेल्यावर बेडवर पांढरी चादर दिसली तर समजा, ती फक्त चादर नाही तर स्वच्छता, विश्वास आणि लक्झरीचे प्रतीक आहे.