महाराष्ट्रातील शनी शिंगणापूर, जिथे एकाही घराला दरवाजा नाही, अध्यात्मिक मान्यता नेमकी काय? - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात असलेले शनी शिंगणापूर हे गाव आजही आपल्या अनोख्या परंपरेमुळे संपूर्ण जगात प्रसिद्ध आहे. या गावातील एकाही घराला, दुकानाला आणि बँकेलाही दरवाजा नाही. एवढेच नाही तर अनेक घरांना तर दरवाजाची चौकटही नाही.

या मागची अध्यात्मिक मान्यता काय आहे?

स्थानिक मान्यतेनुसार, सुमारे 300 वर्षांपूर्वी गावात मुसळधार पाऊस झाला होता. त्यावेळी पानसनाला नदीला पूर आला आणि पुराच्या पाण्यासोबत एक मोठी काळी शिळा वाहत आली. गावकऱ्यांनी ती शिळा काठीने बाजूला करण्याचा प्रयत्न केला असता, त्यातून रक्त येऊ लागले. त्याच रात्री गावातील एका व्यक्तीच्या स्वप्नात शनी देव आले आणि म्हणाले, ही माझी स्वयंभू मूर्ती आहे. मला गावातच स्थापित करा.

तेव्हापासून या गावात शनी देवांची स्वयंभू मूर्ती असून, शनी देवच गावाचे रक्षण करतात, अशी गावकऱ्यांची अढळ श्रद्धा आहे. शनी देवांच्या भीतीमुळे आणि त्यांच्या कृपेमुळे या गावात आजपर्यंत एकही चोरी झालेली नाही, असे गावकरी सांगतात.

जर कोणी चोरी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला शनी देवाच्या कोपाला सामोरे जावे लागते आणि त्याचे वाईट होते, असा समज आहे. त्यामुळे गावकरी आपल्या घराला कुलूप लावत नाहीत. मौल्यवान वस्तू, पैसे, दागिने असे उघड्यावरच ठेवले जातात.

काही वर्षांपूर्वी येथे असलेल्या युनायटेड कमर्शियल बँकेच्या शाखेलाही दरवाजा नव्हता. ती देशातील पहिली बिनादरवाजाची बँक म्हणून ओळखली जात होती. नंतर सुरक्षेच्या कारणास्तव बँकेला दरवाजा लावावा लागला असला तरी, गावातील घरे आजही बिनादरवाजाचीच आहेत.

शनी शिंगणापूर येथे शनी अमावस्येला मोठी यात्रा भरते. देशभरातून लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. विज्ञान कितीही पुढे गेले तरी, येथील लोकांची श्रद्धा आजही तितकीच कायम आहे.