अकोला - शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेना ठाकरे गटाकडून आज वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होण्यापासून शेतकरी आणि शिवसैनिकांना रोखण्याचा प्रयत्न पोलिसांकडून करण्यात आला तर आंदोलन चिघळेल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांची राहील, असा इशारा शिवसेना उपनेते तथा आमदार नितीन देशमुख यांनी दिला आहे.
वाशिम जिल्ह्यातील वनोजा फाटा येथील समृद्धी महामार्गावर हे आंदोलन होणार असून या आंदोलनाची तयारी पूर्ण झाली आहे. या आंदोलनात दहा हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याची माहिती आमदार देशमुख यांनी दिली. शेतकऱ्यांना आणि शिवसैनिकांना आंदोलनात जाण्यापासून रोखणे हा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचा आरोपही त्यांनी केला.
हे आंदोलन कोणाच्याही विरोधात नसून केवळ शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी असल्याचे आमदार देशमुख यांनी स्पष्ट केले. पोलिसांचे काम कायदा व सुव्यवस्था राखणे आहे, त्यांनी तेच काम करावे, असा टोलाही त्यांनी लगावला.
या आंदोलनात पश्चिम विदर्भातील पाचही जिल्ह्यांमधून जवळपास 10 हजार शेतकरी आणि शिवसैनिक सहभागी होणार असल्याचा दावा आमदार देशमुख यांनी केला आहे. दरम्यान, या आंदोलनासाठी आमदार नितीन देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत.
प्रतिनिधी प्रतीक कुऱ्हेकर, अकोला