कृषी : परभणीच्या गंगाखेड तालुक्यात सध्या एक वेगळेच चित्र दिसत आहे. एकीकडे निसर्गाने दिलेला धोका, दुसरीकडे खरीप हंगामातील पिकांची झालेली दुरवस्था आणि डोक्यावर कर्जाचा डोंगर. अशा तिहेरी संकटाच्या गर्तेत सापडलेला शेतकरी पुन्हा एकदा नव्या आशेने शेतात उतरला आहे. खरीपाच्या पदरी निराशा पडली असली तरी रब्बी हंगामातून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागेल या एका आशेवर गंगाखेडचा शेतकरी काळ्या आईची ओटी भरण्यासाठी कामाला लागला आहे.
यंदाचा खरीप हंगाम गंगाखेड तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी खूपच वाईट गेला. सुरुवातीला पावसाने ओढ दिली, नंतर अचानक झालेल्या मुसळधार पावसाने पिके आडवी झाली. सोयाबीन, कापूस, तूर यांसारखी मुख्य पिके हातातून गेली. अनेक शेतकऱ्यांनी सावकाराकडून, बँकेकडून कर्ज काढून पेरणी केली होती. पण पीकच हातात आले नाही त्यामुळे कर्ज फेडायचे कसे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे.
शासनाच्या मदतीची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पंचनामे झाले, अहवाल गेले, पण मदत अजूनही अनेकांपर्यंत पोहोचलेली नाही. अशा परिस्थितीत शेतकऱ्याच्या मनात नैराश्य येणे स्वाभाविक आहे. पण परभणीचा शेतकरी हा नैराश्यात बसणारा नाही. त्याच्या रक्तातच जिद्द आहे. पडला तरी पुन्हा उठायचे आणि पुन्हा लढायचे हीच त्याची ओळख आहे.
म्हणूनच आता गंगाखेड तालुक्यात रब्बी पेरणीच्या कामांना वेग आला आहे. सकाळी पहाटेच शेतकरी बैलजोडी घेऊन किंवा ट्रॅक्टर घेऊन शेतात जाताना दिसत आहेत. कोणी जमीन नांगरणी करत आहे, कोणी हरभरा, ज्वारी आणि गहू पेरणीसाठी बियाणे तयार करत आहे. लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सगळे कुटुंब शेतात राबताना दिसत आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की खरीपाने धोका दिला हे खरे आहे, पण आता रडत बसून चालणार नाही. रब्बी हंगाम हा आमच्यासाठी शेवटची आशा आहे. जर या हंगामात पीक चांगले आले तर किमान कुटुंबाचे दोन वेळचे जेवण तरी भागेल आणि कर्जाचा थोडा भार हलका होईल. या आशेवरच आम्ही पुन्हा काळ्या आईची सेवा करत आहोत.
गंगाखेड तालुक्यातील अनेक गावांमध्ये सध्या हरभरा आणि ज्वारी पेरणीला प्राधान्य दिले जात आहे. कारण ही पिके कमी पाण्यातही येतात. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची सोय आहे ते गहू पेरणीची तयारी करत आहेत. बियाणे आणि खतांच्या दुकानांवर पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. शेतकरी आपल्या ऐपतीप्रमाणे बियाणे घेत आहेत.
निसर्गाची अवकृपा आणि शासनाच्या मदतीचा उशीर यामुळे शेतकरी हतबल झाला असला तरी त्याने हार मानलेली नाही. त्याच्या डोळ्यात आजही एकच स्वप्न आहे की रब्बी हंगाम चांगला जावा. त्याच्या कष्टाला फळ मिळावे. गंगाखेडचा हा लढवय्या शेतकरी पुन्हा एकदा आपल्या जिद्दीने उभा राहतोय, हीच खरी महाराष्ट्राच्या मातीची ताकद आहे.
सरकारने देखील या शेतकऱ्यांच्या जिद्दीला साथ द्यावी. रब्बी हंगामासाठी वेळेवर बियाणे, खते आणि कर्ज उपलब्ध करून द्यावे आणि खरीपच्या नुकसान भरपाईची मदत लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांमधून होत आहे.
प्रतिनिधी : विष्णू सायगुंडे, परभणी