सायबर फसवणुकीपासून सावध राहा, महाराष्ट्र सायबर विभागाचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन - टॉप न्यूज मराठी

महाराष्ट्र : सध्याच्या डिजिटल युगात ऑनलाईन व्यवहार वाढले असून त्यासोबतच सायबर गुन्हे आणि ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्येही वाढ होत आहे. याच पार्श्वभूमीवर नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनामार्फत जनजागृती करण्यात येत आहे.

सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतीने नागरिकांची फसवणूक करतात. कधी बनावट लिंक पाठवून, कधी बँकेकडून बोलत असल्याचे सांगून, तर कधी लॉटरी लागल्याचे आमिष दाखवून फसवणूक केली जाते. याबाबतची सविस्तर माहिती देणारा एक व्हिडिओ महाराष्ट्र सायबर विभागाने प्रसारित केला आहे. हा व्हिडिओ नागरिकांनी काळजीपूर्वक पाहावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या व्हिडिओमध्ये सायबर फसवणूक कशी केली जाते आणि त्यापासून सुरक्षित कसे राहावे, याबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

जर तुमच्यासोबत कधी सायबर गुन्हा घडला किंवा आर्थिक फसवणूक झाली तर घाबरून न जाता तात्काळ मदत घ्या. यासाठी 1930 या राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाइन क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा. तसेच http://www.cybercrime.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता. लवकर तक्रार केल्यास पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असते.

कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका, आपला ओटीपी आणि बँक डिटेल्स कोणालाही सांगू नका. सतर्क राहा, सुरक्षित राहा, असे आवाहन महाराष्ट्र सायबर, महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आले आहे.