दिलासादायक बातमी : कॅन्सरवरील औषधे स्वस्त होणार? सुप्रीम कोर्टात याचिकेवर लवकरच सुनावणी - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : कर्करोगावरील महागड्या उपचारामुळे रुग्ण आणि कुटुंबीयांवर मोठा आर्थिक भार पडतो. याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून दिलासादायक पाऊल उचलले जात आहे. कॅन्सरवरील औषधांवरील ट्रेड मार्जिन 30 टक्क्यांपर्यंत मर्यादित करण्याची तयारी सरकारने दाखवली आहे. यासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या सुनावणीत सरकारने शपथपत्र दाखल केले आहे.

औषधांच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती 10 ते 15 दिवसात अहवाल देणार आहे. राष्ट्रीय औषधी किंमत प्राधिकरणाच्या 8 ऑक्टोबरच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.

या निर्णयामुळे कॅन्सर औषधांच्या किंमतीत 20 ते 70 टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता आहे. यापूर्वी 2019 मध्ये 42 कॅन्सर औषधांवरील ट्रेड मार्जिन 30 टक्के केल्याने 526 ब्रँडच्या किंमती कमी झाल्या होत्या.