व्यक्तिविशेष : अलिबागच्या चाळीतून थेट संसदेपर्यंतचा संजय राऊत यांचा प्रवास हा पत्रकारितेतून राजकारणात आलेल्या नेत्याचे उत्तम उदाहरण आहे. ठाकरे कुटुंबाचे अत्यंत विश्वासू, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक अशी त्यांची ओळख आहे. सध्या अल्बानिया देशातील सुप्रीम कोर्ट जाळल्याच्या व्हिडिओसोबत केलेल्या पोस्टमुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत.
जन्म आणि सुरुवातीचे जीवन -
संजय राजाराम राऊत यांचा जन्म 15 नोव्हेंबर 1961 रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग येथे एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात झाला. त्यांचे कुटुंब चौकळशी समाजाचे आहे. लहानपणीच त्यांचे कुटुंब मुंबईतील भांडुप आणि दादर भागात स्थायिक झाले. हा भाग शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्यावर शिवसेनेच्या विचारांचा प्रभाव होता.
शिक्षण -
त्यांनी मुंबईतील वडाळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बी.कॉम पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना लेखन आणि वाचनाची आवड होती.
कुटुंब -
वडील राजाराम राऊत आणि आई सविता राऊत. त्यांचे बंधू सुनील राऊत हे देखील शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आहेत. 16 फेब्रुवारी 1993 रोजी त्यांचा विवाह वर्षा राऊत यांच्याशी झाला ज्या पेशाने शिक्षिका आहेत. त्यांना पूर्वशी आणि विधिता अशा दोन मुली आहेत. त्यांचे मुंबईतील भांडुप येथील मैत्री हे निवासस्थान आहे.
सामना ते संसद - राजकीय प्रवास -
संजय राऊत यांची खरी ओळख पत्रकार म्हणून झाली. 80 च्या दशकात त्यांनी लोकसत्ता समूहाच्या लोकप्रभा साप्ताहिकात गुन्हेगारी वार्ताहर म्हणून काम सुरू केले. याच काळात त्यांचे लेखन बाळासाहेब ठाकरे यांच्या नजरेस पडले. बाळासाहेबांनी त्यांना थेट सामनाची जबाबदारी दिली. सामनाचे कार्यकारी संपादक झाल्यानंतर त्यांचे रोखठोक अग्रलेख हेच शिवसेनेची अधिकृत भूमिका मानली जाऊ लागली.
पत्रकारितेतूनच त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे म्हणून ते ओळखले जाऊ लागले. 2004 मध्ये शिवसेनेने त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले. 2005 मध्ये त्यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती झाली. त्यानंतर 2010, 2016 आणि पुन्हा 2022 मध्ये ते राज्यसभेवर निवडून आले. त्यांचा सध्याचा कार्यकाळ जुलै 2028 पर्यंत आहे. संसदेत ते गृह व्यवहार समिती आणि इतर महत्त्वाच्या समित्यांचे सदस्य राहिले आहेत.
2019 मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका सर्वात महत्त्वाची मानली गेली. सकाळी सकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदा आणि भाजपवर केलेली टीका यामुळे ते ठाकरेंचे शिलेदार म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे या चित्रपटाचे लेखनही केले आहे जो 2019 मध्ये प्रदर्शित झाला.
वादग्रस्त घटना - रोखठोक बोलण्यामुळे ते अनेकदा वादात अडकतात..
पहिला वाद 2012 मधील फेसबुक पोस्ट प्रकरणाचा आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या निधनानंतर मुंबई बंदबाबत पोस्ट करणाऱ्या दोन तरुणींना अटक झाली होती, त्यावेळी राऊत यांनी पोलीस कारवाईचे समर्थन केले होते.
दुसरा मोठा वाद पत्राचाळ घोटाळा प्रकरणाचा आहे. या प्रकरणात ईडीने 2022 मध्ये त्यांना अटक केली होती आणि त्यांना 100 दिवसांपेक्षा जास्त काळ तुरुंगात राहावे लागले होते.
तिसरा वाद कंगना राणौत प्रकरणाच्या वेळी झाला. त्यावेळी केलेल्या एका वक्तव्यावरून राष्ट्रीय स्तरावर मोठा वाद निर्माण झाला होता.
चौथा वाद त्यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा आणि सामनातील अग्रलेखांमुळे होत असतो ज्यातून अनेकदा मानहानीचे दावे दाखल झाले आहेत.
आणि आताचा पाचवा वाद अल्बानिया पोस्टचा आहे ज्यात त्यांनी अल्बानियातील सुप्रीम कोर्ट जाळल्याच्या घटनेचा व्हिडिओ शेअर करत भारताने धडा घेतला पाहिजे असे म्हटले आहे. यावरून दिल्ली पोलिसांकडे त्यांच्याविरोधात तक्रार दाखल झाली आहे.