महाराष्ट्र : महाराष्ट्रात यंदा पावसाने मोठी पाठ फिरवली आहे. राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळाची स्थिती जाहीर करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी पेरण्या वाया गेल्या आहेत, उभे पीक जळून गेले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला आहे आणि दिवाळी कशी साजरी करायची हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी काल दसरा मेळाव्यात माहिती दिली की, राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबासाठी मदत पाठवण्यात येत आहे. प्रत्येक शेतकरी कुटुंबाला दिवाळीपूर्वी 5000 रुपये थेट खात्यात जमा केले जाणार आहेत.
इतकेच नाही तर दिवाळीचा सण गोड व्हावा म्हणून सरकारकडून दिवाळी रेशन किटचे ट्रक भरून पाठवण्यात आले आहेत. या किटमध्ये साखर, रवा, तेल, डाळ अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. सुमारे 100 टन धान्य दुष्काळी भागात वाटप केले जात असल्याचे सरकारने सांगितले आहे.
दसरा मेळाव्यात बोलताना शिंदे म्हणाले की, शेतकऱ्यांना मदत करणे हे राजकारणापेक्षा महत्त्वाचे आहे. मुंबईत येऊन गर्दी करण्यापेक्षा शेताच्या बांधावर जाऊन मदत करा, असे आवाहन त्यांनी शिवसैनिकांना केले आहे. मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न आणि पाण्याची सोय यासाठीही सरकार योजना आणणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांनी हातातोंडाशी आलेले पीक गमावले आहे. अशा वेळी सरकारची ही मदत दिवाळीपूर्वी दिलासा देणारी ठरणार आहे.