मोठी बातमी : एपस्टीन प्रकरणामध्ये मोदी सरकारमधील बड्या नेत्याचा सहभाग ? संजय राऊत यांनी थेट फोटोचं पोस्ट केले, फाईल पुन्हा उघडणार ? - टॉप न्यूज मराठी

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री हरदीप सिंह पुरी यांचा अमेरिकन फायनान्सर जेफ्री एपस्टीन सोबतचा कथित फोटो X वर पोस्ट केला आहे. राऊत यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे की, मोदिजी एक मंत्री हरदीप पुरी एपस्टीनला एकट्यात भेटत आहेत, कुणाचा संदेश घेऊन भेटत आहेत, ही तर सुरुवात आहे. या पोस्टसोबत अमेरिकेच्या न्याय विभागाने जारी केलेल्या फाईलमधील फोटो असल्याचा दावा करण्यात आला आहे. हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

नेमकं प्रकरण काय 

अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीन प्रकरणाशी संबंधित काही कागदपत्रे आणि फोटो पुन्हा सार्वजनिक केले आहेत. त्यानंतर हरदीप पुरी यांचे नाव त्यात आल्याची चर्चा सुरू झाली. यापूर्वी फेब्रुवारी 2026 मध्ये पुरी यांनी स्वतः सांगितले होते की, त्यांची एपस्टीनसोबतची भेट ही इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूट, न्यूयॉर्कमध्ये काम करत असताना तीन ते चार वेळा एका शिष्टमंडळाचा भाग म्हणून झाली होती. ही भेट व्यावसायिक स्वरूपाची होती आणि भारतातील मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया सारख्या संधींबाबत चर्चा होती, असे त्यांनी स्पष्ट केले होते. हा फोटो त्या भेटींपैकी आहे का याचा अधिकृत तपशील अजून समोर आलेला नाही.

हरदीप सिंह पुरी हे सध्या केंद्र सरकारमध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री आहेत. ते 2017 पासून मोदी मंत्रिमंडळात आहेत. त्यापूर्वी ते भारतीय विदेश सेवेत अधिकारी होते आणि संयुक्त राष्ट्रात भारताचे स्थायी प्रतिनिधी म्हणून काम केले आहे. तसेच ते न्यूयॉर्कमधील इंटरनॅशनल पीस इन्स्टिट्यूटचे अध्यक्षही होते. ते अनुभवी मुत्सद्दी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जातात.

एपस्टीन फाईल प्रकरण काय आहे तर जेफ्री एपस्टीन हा अमेरिकन अब्जाधीश होता, त्याच्यावर अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण आणि मानवी तस्करीचे गंभीर आरोप होते. 2019 मध्ये तुरुंगात त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचे अनेक प्रभावशाली लोकांसोबतचे संबंध, ईमेल, फोटो आणि संपर्क यादी याबद्दल अमेरिकेच्या न्याय विभागाकडून वेळोवेळी कागदपत्रे जारी केली जातात. या फाईल्समध्ये अनेक मोठ्या राजकीय नेत्यांची, उद्योगपतींची नावे आली होती म्हणून हे प्रकरण जगभरात गाजले होते. एका फोटो किंवा भेटीवरून एखादी व्यक्ती त्याच्या गुन्हेगारी कृत्यात सहभागी आहे हे सिद्ध होत नाही, हे न्याय विभागाच्या फाईल्समध्येही स्पष्ट केले जाते