आरोग्य : उष्णतेची लाट येणार आरोग्याची अशी घ्या काळजी लहान मुलं आणि वृद्धांना संभाळा भीती नाही काळजी अशी घ्या... - टॉप न्यूज मराठी

राज्याच्या अनेक भागात सूर्य आग ओकत आहे. अतिउष्माघातामुळे अनेकजण आजारी पडत आहेत. पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहणार आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाने अतिउष्माघात ही वैद्यकीय आणीबाणी असल्याचा इशारा राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिला आहे.

राज्यातील अतिउष्णतेच्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने मेडिकल अॅडव्हायझरी जारी केली असून उष्माघातामध्ये कोणती काळजी घ्यावी याचा सल्ला राज्यातील जनतेला दिला आहे. तहान लागली नसली तरीही शक्य असेल तेव्हा पुरेसे पाणी प्या. तहान लागणे हे निर्जलीकरणाचे लक्षण आहे. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन ओआरएस आणि लिंबूपाणी, ताक, लस्सी, यासारखे घरगुती पेय वापरा, थोडेसे मीठ घालून फळांचा रस घ्या. टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी, कोशिंबिर इतर उपलब्ध फळे आणि भाज्या यासारख्या पाण्याचे प्रमाण असलेली हंगामी फळे आणि भाज्या खा.

कपडे कोणते घालावे?

पातळ सैल, सुती कपडे, शक्यतो फिकट रंगाचे कपडे घाला. डोके, झाकून ठेवा. थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात असताना छत्री, टॉवेलने डोके झाकून ठेवा. सूर्यप्रकाशात-उन्हात बाहेर जाताना बूट किंवा चप्पल घाला.

कोणाला त्रास होण्याची शक्यता?

लहान मुले आणि बालके, घराबाहेर काम करणारे लोक, शारीरिकदृष्ट्या आजारी, खास करून हृदयरोग आणि उच्चरक्तदाबाचे रुग्ण, गर्भवती महिला, मानसिक आजार असलेल्या व्यक्ती.

घरात कोणती खबरदारी घ्यावी?

एकटे राहणारी वृद्ध, आजारी व्यक्तींची काळजी घ्यावी. तुमचे घर थंड ठेवा, पडदे, शटर किंवा सनशेड वापरा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा. दिवसा खालच्या मजल्यावर राहण्याचा प्रयत्न करा. शरीर थंड करण्यासाठी पंखे, स्प्रे बाटल्या. ओले कापड, बर्फाचा वापर करा. 20 अंश सेल्सिअस असलेल्या पाण्यात घोट्यापर्यंत पाय बुडवल्याने निर्जलीकरण आणि थर्मल अस्वस्थता कमी होऊन जलद थंडावा मिळतो.

उष्माघाताची कोणती लक्षणे आहेत?

फेफरे आणि कोमामध्ये जाणे, गरम लाल आणि कोरडी त्वचा, शरीराचे तापमान चाळीस अंश सेल्सिअस, 104 फॅरेनहाइट, धडधडणारी डोकेदुखी, चिंता, चक्कर येणे, मूर्च्छा येणे आणि डोके हलके होणे, स्नायू कमकुवत होणे, मळमळ आणि उलटी, हृदयाचे जलद ठोके पडणे किंवा श्वास घेण्यास त्रास, जेवण्याची इच्छा न होणे, अति चिडचिडेपणा, लघवीचे प्रमाण कमी, तोंड कोरडे पडणे, शुष्क त्वचा, खोल गेलेले डोळे, सुस्ती येणे, जखडणे, शरीराच्या कोणत्याही भागातून रक्तस्त्राव होणे.