विधान परिषद पदवीधर आणि शिक्षक निवडणुकीत मतदान कसे करायचे, मत बाद होऊ नये म्हणून हे वाचा - टॉप न्यूज मराठी

पुणे : भारत निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीची मतदान पद्धत आणि इतर सार्वत्रिक निवडणुकीतील मतदान पद्धतीत मोठा फरक आहे. विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावापुढे पसंतीक्रम नोंदवून मतदान करावे लागते. जितके उमेदवार निवडणूक लढवत असतील त्या सर्वांसमोर पसंतीक्रम देता येतो. त्यामुळे मतदारांनी आणि विशेषतः पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांनी ही पद्धत समजून घेऊन मतदान करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले आहे.

असे करा मतदान -

मतदान करण्यासाठी निवडणूक अधिकाऱ्याने मतपत्रिकेबरोबर दिलेले जांभळ्या रंगाचे स्केच पेनच वापरावे. इतर कोणतेही पेन, पेन्सिल, बॉलपेन किंवा लेखनाचे साधन वापरू नये. तसे केल्यास मतपत्रिका अवैध ठरेल.

उमेदवाराच्या नावाच्या समोर असलेल्या पसंतीक्रमाच्या स्तंभात तुम्ही पहिली पसंती म्हणून निवडलेल्या उमेदवाराच्या नावासमोर 1 असा आकडा लिहा. हा 1 हा आकडा फक्त एकाच उमेदवाराच्या नावासमोर द्यावा. एकापेक्षा जास्त उमेदवारांची निवड करायची असली तरी 1 हा आकडा एकाच उमेदवारासमोर लिहावा.

निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या विचारात न घेता जेवढे उमेदवार उभे असतील तेवढे पसंतीक्रम देता येतील. उदाहरणार्थ पाच उमेदवार निवडून द्यायचे असले तरी तुम्हाला तुमच्या पसंतीनुसार 1 ते 5 असे आकडे घालता येतील. उर्वरित उमेदवारांबाबत तुमचा पुढील पसंतीक्रम 2, 3, 4 असे आकडे घालून दाखवा.

कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर फक्त एकच आकडा आहे आणि तोच आकडा दुसऱ्या उमेदवारासमोर नाही याची खात्री करा. पसंतीक्रम फक्त 1, 2, 3 अशा आकड्यांमध्येच दाखवावा. एक, दोन, तीन अशा शब्दांत लिहू नये. हे आकडे 1, 2, 3 अशा आंतरराष्ट्रीय रूपात किंवा I, II, III अशा रोमन रूपात किंवा १, २, ३ अशा देवनागरी रूपात किंवा संविधानाच्या आठव्या अनुसूचीत मान्यता असलेल्या कोणत्याही भारतीय भाषेत लिहिता येतील.

मतपत्रिकेवर मतदाराने आपले नाव, आद्याक्षरे, इतर शब्द लिहू नयेत किंवा सही करू नये. अंगठ्याचा ठसा उमटवू नये. असे केल्यास मतपत्रिका अवैध ठरेल.

पसंतीक्रम दाखवण्यासाठी उमेदवाराच्या नावासमोर टिक मार्क किंवा क्रॉसची खूण करू नये. असे केल्यास मतपत्रिका बाद होईल. पसंतीक्रम फक्त आकड्यांमध्येच दाखवावा.

मतपत्रिका वैध ठरण्यासाठी एका उमेदवारासमोर 1 हा आकडा लिहून पहिली पसंती दाखवणे गरजेचे आहे. इतर पसंतीक्रम देणे ऐच्छिक आहे. म्हणजे दुसरी किंवा पुढील पसंती द्यायची की नाही हे तुमच्या इच्छेवर आहे.

अशा मतपत्रिका अवैध ठरतील -

1 हा आकडा लिहिलेला नसेल तर. 1 हा आकडा एकापेक्षा जास्त उमेदवारांसमोर लिहिला असेल तर. 1 हा आकडा कोणाला दिला आहे हे समजत नसेल अशा पद्धतीने लिहिला असेल तर. एकाच उमेदवारासमोर 1 आणि त्याबरोबर 2, 3 असे आकडे लिहिले असतील तर. पसंतीक्रम आकड्यांऐवजी शब्दांमध्ये लिहिला असेल तर. मतदाराची ओळख पटेल अशी खूण किंवा लिखाण असेल तर आणि जांभळ्या रंगाच्या स्केच पेन व्यतिरिक्त इतर कोणत्याही पेनने आकडा लिहिला असेल तर ती मतपत्रिका अवैध ठरेल.