आरोग्य : दुपारी जेवण झालं की डोळे आपोआप जड होतात आणि खूप झोप येते. अनेकांना वाटते दुपारी झोपल्याने वजन वाढते म्हणून ते झोप टाळतात. पण खरंच दुपारच्या झोपेमुळे वजन वाढतं का, याबद्दल रिसर्च काय सांगते ते पाहूया.
फिट राहण्यासाठी लोक जिममध्ये जातात, योगा करतात, डाएट करतात. पण तरीही वजन काही कमी होत नाही. यामागे झोप हे सुद्धा एक मोठे कारण असू शकते. हार्मोन्स बिघडले की वजन वाढते आणि झोपेचा थेट परिणाम हार्मोन्सवर होतो.
दुपारी झोपल्याने जास्त कॅलरीज बर्न होतात का -
हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये यावर एक रिसर्च झाली आहे. या रिसर्चनुसार सकाळी झोपण्यापेक्षा दुपारी झोपल्याने 10 टक्के जास्त कॅलरीज बर्न होतात. दुपारी थोडा वेळ झोप घेतल्याने शरीरातील एनर्जी वाढते आणि मेटाबॉलिझम म्हणजेच चयापचय क्रिया फास्ट होते. चयापचय क्रिया वाढली की वजन कमी व्हायला मदत होते. म्हणजेच दुपारची छोटी झोप वजन वाढवत नाही तर ती फायद्याची ठरू शकते.
दिवसा किती वेळ झोपावे -
अनेकांना प्रश्न पडतो दुपारी किती वेळ झोपावे. जर तुम्ही दुपारी 2 ते 3 तास झोपलात तर रात्री झोप येणार नाही आणि पूर्ण रुटीन बिघडेल. त्यामुळे दुपारी फक्त 15 ते 30 मिनिटांची पॉवर नॅप घ्यावी. याला दुपारची डुलकी असेही म्हणतात. या 20 मिनिटांच्या झोपेने थकवा दूर होतो, डोकेदुखी कमी होते आणि फ्रेश वाटते. जर तुम्हाला कामाच्या ठिकाणी झोप येत असेल तर 15 मिनिटे डोळे बंद करून बसले तरी चालेल.
कमी झोपल्याने वजन का वाढते -
2016 मध्ये स्लीप जर्नलमध्ये एक रिपोर्ट आला होता. त्यात सांगितले होते की अपुऱ्या झोपेमुळे स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला की शरीरात कॉर्टिसॉल नावाचा हार्मोन वाढतो. हा हार्मोन घ्रेलिन नावाचा हार्मोन तयार करतो. घ्रेलिनला भूक वाढवणारा हार्मोन असे म्हणतात. हा हार्मोन जास्त तयार झाला की आपल्याला सारखी भूक लागते आणि आपण जास्त खातो.
अमेरिकन जर्नल ऑफ न्यूट्रिशनमध्ये प्रकाशित झालेल्या दुसऱ्या रिसर्चनुसार कमी झोपल्याने मेंदू सारखा खाण्याकडे आकर्षित होतो. म्हणजे जे लोक रात्री 5 ते 6 तासांपेक्षा कमी झोपतात ते गोड पदार्थ आणि तेलकट पदार्थ जास्त खातात आणि त्यांच्या खाण्यावर कंट्रोल राहत नाही. त्यामुळे वजन वाढते.
म्हणून लक्षात ठेवा दुपारची 20 मिनिटांची झोप शत्रू नाही तर मित्र आहे. पण ती 1 तासापेक्षा जास्त झाली तर मात्र ती आळस आणि वजन वाढण्याचे कारण बनू शकते.