टायगर श्रॉफ हल्ला प्रकरणात मोठी अपडेट, नेपाळला पळणाऱ्या तिघांना कोटामध्ये अटक - टॉप न्यूज मराठी

मुंबई : बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफवर झालेल्या हल्ला प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या तीनही आरोपींना राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. हे तिन्ही आरोपी पुणे जयपूर एक्सप्रेसने पळून जात होते, त्यावेळी कोटा रेल्वे स्थानकावर अवघ्या 15 मिनिटात ट्रेन चेक करून त्यांना पकडण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांनी आरोपी या ट्रेनमधून येत असल्याची माहिती राजस्थान पोलिसांना दिली होती. त्यानुसार कोटा सिटी पोलिसांनी तातडीने कारवाई करत जनरल डब्यात बसलेल्या तिघांना ताब्यात घेतले.

चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे तिघेही दिल्लीमार्गे नेपाळला पळून जाण्याच्या प्लानमध्ये होते. तसेच ते सतत अनिल पंडित नावाच्या व्यक्तीच्या संपर्कात होते, असे राजस्थान पोलिसांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अटक केलेल्या आरोपींमध्ये एक 17 वर्षांचा अल्पवयीन मुलगा आहे जो हरियाणाच्या सोनीपत जिल्ह्यातील आहे. दुसरा आरोपी 18 वर्षीय रेहान असून तोही सोनीपतचाच रहिवासी आहे आणि त्याच्यावर यापूर्वी आर्म्स अॅक्टसह अनेक गुन्हे दाखल आहेत. तिसरा आरोपी 22 वर्षीय ऋतिक कुमार उर्फ रोशन हा मूळचा बिहारच्या बेगूसरायचा असून सध्या मुंबईतील अंधेरी परिसरात राहतो आणि रॅपिडो रायडर म्हणून काम करतो.

पोलिसांना या तिघांकडे कोणतेही हत्यार सापडले नाही. हल्ल्यानंतर त्यांनी शस्त्र कुठे लपवले याचा तपास सुरू आहे. दोन आरोपींवर यापूर्वी बाईक चोरीचे गुन्हे असल्याचेही समोर आले आहे.

सध्या कोटा पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतले असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना आजच मुंबई पोलिसांच्या हवाली केले जाणार आहे.