पुणे : ‘सध्याच्या स्पर्धेच्या युगात स्मार्ट राहण्याबरोबरच स्मार्ट वागण्याची, स्मार्ट बोलण्याची, कोणतीही गोष्ट स्मार्टपणे करण्याची सवय लावून घ्यायला हवी,’ असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले.
खडकी शिक्षण संस्थेने राबविलेल्या ‘स्मार्ट युनिट’ व ‘स्मार्ट क्लासरूम’ स्पर्धेच्या पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. वरिष्ठ पत्रकार निरंजन आगाशे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याप्रसंगी सचिव आनंद छाजेड यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. वृक्षाला जल अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ ही नवसंकल्पना या कार्यक्रमात रूजवण्यात आली.
‘मुलांनी मोबाइल वापरायला हरकत नाही. मात्र, त्याचा शिक्षणासाठी कसा वापर करायचा याचे तंत्र आत्मसात करणे आवश्यक आहे,’ असेही गोयल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले.
स्मार्ट युनिट स्पर्धेत खडकी शिक्षण संस्थेच्या ११ शाखांपैकी चेतन दत्ताजी गायकवाड इंग्लिश मीडियम स्कूलला प्रथम, आलेगावकर प्राथमिक व बालशिक्षण मंदिरला द्वितीय, तर आलेगावकर माध्यमिक विद्यालयाला तृतीय क्रमांक मिळाला. स्मार्ट क्लासरूम स्पर्धेत सी. के. गोयल कॉलेजच्या बारावी कॉमर्सच्या (ई) वर्गाने प्रथम, जीएमआय कन्याशाळेच्या आठवीच्या वर्गाने द्वितीय, तर टी. जे. कॉलेजच्या इतिहास विभागाच्या वर्गाने तृतीय क्रमांक पटकावला. १५ परीक्षकांच्या तीन समित्यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.
प्रा. सुग्रीव सावंत व प्रा. मंगेश दळवी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. वैशाली वाघ यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर संस्थेचे सीईओ उत्तमकुमार इंदोरे यांनी आभार मानले.