पर्यटन विशेष : महाराष्ट्राचे भरतपूर, नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य, पुण्यातून कस जाल, कधी जाल आणि काय काय पाहाल - टॉप न्यूज मराठी

पर्यटन विशेष : निसर्ग आणि पक्ष्यांवर प्रेम करणाऱ्यांसाठी नांदूर मधमेश्वर हे महाराष्ट्रातील एक लपलेले स्वर्गच आहे. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या या अभयारण्याला महाराष्ट्राचे भरतपूर असेही म्हटले जाते. गोदावरी आणि कडवा नदीच्या संगमावर तयार झालेल्या या पाणथळ जागेला 2020 मध्ये रामसर स्थळाचा दर्जा मिळाला आहे.

पुण्यातून अंतर आणि कसे जायचे -

पुण्यातून नांदूर मधमेश्वर सुमारे 210 ते 220 किलोमीटर अंतरावर आहे. प्रवासासाठी 4 ते 5 तास लागतात.

बाय रोड - पुणे - नारायणगाव - संगमनेर - सिन्नर - नांदूर मधमेश्वर असा सगळ्यात सोपा मार्ग आहे. स्वतःची गाडी किंवा कार भाड्याने घेणे हा उत्तम पर्याय आहे कारण अभयारण्यापर्यंत थेट सार्वजनिक वाहतूक कमी आहे.

बाय ट्रेन - पुण्यातून नाशिकला जाणाऱ्या अनेक ट्रेन आहेत. नाशिक रोड किंवा थेट निफाड रेल्वे स्टेशनला उतरता येते. निफाड स्टेशन हे अभयारण्यापासून फक्त 12 किलोमीटर अंतरावर आहे. तिथून ऑटो किंवा टॅक्सी सहज मिळते.

बाय बस - पुण्यातून नाशिकला एसटी किंवा प्रायव्हेट बसने जाऊन, तिथून निफाडकडे जाणारी लोकल बस घेता येते. वन विभागाची एक खास सुविधा आहे, दररोज सकाळी 7 वाजता नाशिकच्या मध्यवर्ती बस स्थानकाजवळील मुख्य वनसंरक्षक कार्यालयापासून पक्षी निरीक्षणासाठी गाडी सुटते आणि दुपारी 12 वाजेपर्यंत परत येते.

राहण्याची आणि खाण्यापिण्याची सोय -

अभयारण्याच्या आत मोठे हॉटेल नाही, पण वन विभागाचे निसर्ग निवास आणि इको डेव्हलपमेंट कमिटीचे छोटे कॉटेज आहेत. आगाऊ बुकिंग करावे लागते. जास्त सोय हवी असेल तर नाशिक शहरात राहणे चांगले, नाशिक येथून 40 किलोमीटरवर अभयारण्य आहे. नाशिकमध्ये सर्व प्रकारची हॉटेल्स मिळतात.

खाण्यासाठी अभयारण्य परिसरात स्थानिक बचत गटांचे छोटे स्टॉल आहेत, जिथे मिसळ पाव, वडा पाव, थाळी, चहा मिळतो. पक्षी अभयारण्यात जाताना स्वतःचे पाणी आणि थोडे खाणे सोबत ठेवावे. आत प्लास्टिकला बंदी आहे.

तिथे नेमके काय पाहायचे -

हे अभयारण्य 10 हजार हेक्टरवर पसरले असून त्यातील 1765 हेक्टर हा गाभा क्षेत्र आहे. इथे 265 पेक्षा जास्त पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी 80 प्रजाती स्थलांतरित आहेत.

तुम्हाला इथे पांढरा करकोचा, चमच्या पक्षी, रोहित म्हणजे फ्लेमिंगो, ब्राह्मणी बदक, पिनटेल, क्रेन, पेंटेड स्टॉर्क, ईस्टर्न इम्पेरियल ईगल, वुली नेक्ड स्टॉर्क अशा दुर्मिळ पक्ष्यांचे दर्शन होईल. यावर्षीपासून इथे पेंटेड स्टॉर्क कायमचे राहू लागले आहेत, 2016 मध्ये 2 घरटी होती, आता 80 घरटी झाली आहेत.

पक्ष्यांव्यतिरिक्त 400 प्रकारच्या वनस्पती, 24 प्रकारचे मासे, कोल्हा, रानडुक्कर, भेकर असे प्राणीही आढळतात. इथे वॉच टॉवरवरून दुर्बिणीतून पक्षी पाहणे, बोटिंग, नेचर वॉक, फोटोग्राफी करता येते. नेचर इंटरप्रिटेशन सेंटरमध्ये पक्ष्यांचे फोटो आणि माहिती मिळते.

कोणत्या महिन्यात भेट द्यावी -

भेट देण्यासाठी सगळ्यात उत्तम काळ आहे ऑक्टोबर ते मार्च. विशेषतः नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळात सायबेरियासह हजारो किलोमीटर दूरून पक्षी येतात. सकाळी सूर्योदयाच्या वेळी 6 ते 9 वाजेपर्यंत आणि संध्याकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत पक्ष्यांचा वावर जास्त असतो. मार्च महिन्यात इथे दोन दिवसांचा पक्षी महोत्सव देखील भरतो.

टिप्स - सकाळी लवकर पोहोचा, गडद रंगाचे कपडे घालू नका, मोठ्याने आवाज करू नका, गाईड सोबत घेतल्यास जास्त पक्षी पाहता येतील. दुर्बीण आणि कॅमेरा सोबत ठेवा.