इन्फॉर्मेटिव्ह : अनेकांना सवय असते रात्री झोपताना मोबाईल चार्जिंगला लावून सकाळपर्यंत तसाच ठेवण्याची. सकाळी उठल्यावर मोबाईल 100 टक्के चार्ज झालेला असतो, पण ही सवय तुमच्या मोबाईलसाठी आणि तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.
रात्रभर चार्जिंगवर ठेवल्याने काय होते. आजच्या स्मार्टफोनमध्ये लिथियम आयन बॅटरी असते. ही बॅटरी 100 टक्के चार्ज झाल्यावर कंपनीने दिलेले ऑटो कटऑफ सिस्टम चार्जिंग थांबवते. पण तरीही फोन चार्जरला जोडलेला असेल तर 99 टक्के झाल्यावर पुन्हा चार्ज होऊ लागतो. याला ट्रिकल चार्जिंग म्हणतात. रात्रभर हा प्रकार वारंवार घडतो. यामुळे बॅटरी सतत गरम होते आणि तिची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते.
बॅटरी फुगण्यामागचे खरे कारण. बॅटरी फुगणे म्हणजे आतमध्ये वायू तयार होणे. जास्त गरम होणे, लोकल किंवा डुप्लिकेट चार्जर वापरणे आणि रात्रभर चार्जिंगवर ठेवणे हे मुख्य कारण आहे. बॅटरी जास्त गरम झाली की आतल्या रसायनांमध्ये बदल होतो आणि वायू तयार होऊन बॅटरी फुगते. कधी कधी ही फुगलेली बॅटरी फुटण्याचा धोका देखील असतो.
आगीचा धोका आहे का. हो, जर तुम्ही बेडवर उशीखाली किंवा चादरीखाली फोन चार्जिंगवर ठेवला आणि बॅटरी जास्त गरम झाली तर आग लागण्याचा धोका असतो. विशेषतः स्वस्त आणि लोकल चार्जर वापरत असाल तर हा धोका जास्त वाढतो.
मोबाईल बॅटरी जास्त काळ टिकवण्यासाठी काय करावे. शक्यतो फोन 20 टक्क्यांपेक्षा कमी होऊ देऊ नका आणि 80 ते 85 टक्क्यांपर्यंतच चार्ज करा. रात्रभर चार्जिंगवर ठेवणे टाळा. नेहमी कंपनीचा ओरिजनल चार्जरच वापरा. चार्जिंग करताना फोनवर गेम खेळणे किंवा व्हिडिओ पाहणे टाळा कारण यामुळे फोन डबल गरम होतो. महिन्यातून एकदा फोन पूर्ण 0 ते 100 टक्के चार्ज करा जेणेकरून बॅटरी कॅलिब्रेट होईल.
जर तुमच्या फोनची बॅटरी फुगली असेल, बॅक पॅनल उघडले असेल किंवा फोन जास्त गरम होत असेल तर लगेच चार्जिंग थांबवून सर्व्हिस सेंटरमध्ये दाखवा. स्वतः बॅटरीला टोचा मारू नका किंवा दाबू नका.
योग्य पद्धतीने चार्जिंग केल्यास बॅटरीचे आयुष्य 2 ते 3 वर्षे चांगले राहते.