Pune : पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची मतमोजणी प्रक्रिया अचूक, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडावी असे निर्देश विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिले आहेत.
पुणे येथील अल्पबचत भवन सभागृहात मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणाला सह आयुक्त संजय पलांडे, अपर जिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांच्यासह निवडणूक प्रक्रियेशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या वेळी बोलताना विभागीय आयुक्त म्हणाल्या की मतपत्रिकांवरील पसंतीक्रमानुसार मतमोजणी होत असल्याने प्रत्येक टप्प्यावर विशेष काळजी घ्यावी. घाई करून चुका करण्यापेक्षा प्रत्येक टप्पा नियमानुसार पूर्ण करणे महत्त्वाचे आहे. एका कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे संपूर्ण पथकाचे श्रम वाया जाऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी जबाबदारीने काम करावे. टेबलवरील पर्यवेक्षक, सहाय्यक आणि माहिती संकलन पथकात समन्वय असणे आवश्यक आहे.
विधान परिषदेची मतमोजणी ईव्हीएमवरील मतमोजणीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे वैध आणि अवैध मतपत्रिका, नोंदी ठेवणे आणि प्रतिनिधींच्या स्वाक्षऱ्या घेणे या बाबत दक्षता घ्यावी असे त्यांनी सांगितले. निवडणूक कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
सह आयुक्त संजय पलांडे यांनी मतमोजणीचे टप्पे, जबाबदाऱ्यांची विभागणी आणि निवडणूक आयोगाचे नियम याबाबत मार्गदर्शन केले. तर अरुण आनंदकर यांनी सांगितले की 26 ऑक्टोबर रोजी बालेवाडी येथे प्रत्यक्ष प्रशिक्षण होणार आहे. यात मतपेट्या उघडणे, 50 मतपत्रिकांचे गठ्ठे तयार करणे आणि संपूर्ण मतमोजणी प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दिले जाणार आहे.
प्रशिक्षणादरम्यान कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.