परदेशात असलेल्या नातेवाईकांना दिवाळीच्या फराळाचा आनंद घेता यावा म्हणून पुणे टपाल विभाग यंदा पुन्हा सज्ज झाला आहे. दिवाळीनिमित्त पुणे टपाल विभागाने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला आहे.
तुम्ही फक्त फराळाचे पदार्थ द्या, त्याचे नाममात्र किमतीमध्ये पॅकेजिंग करून माफक दरात परदेशात पाठवण्याची सोय पोस्ट ऑफिसने केली आहे.
दिवाळीचा फराळ करून तयार आहे पण तो पाठवण्याचा मुहूर्त लागत नाही, तसेच रोजच्या कामातून वेळ काढून पोस्ट ऑफिसमध्ये येता येत नाही अशा नागरिकांसाठी घरून फराळ पार्सल घेऊन जाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी पोस्टमन घरी येऊन फराळाचे पार्सल विनामूल्य घेऊन जातील.
नोकरी आणि शिक्षणानिमित्त पुण्यातून परदेशात जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. परदेशात असलेल्या प्रत्येकालाच दिवाळी सणासाठी भारतात आणि पुण्यात येणे शक्य होत नाही. ही बाब लक्षात घेऊन जगभरातील प्रियजनांना फराळाचे पदार्थ आणि भेटवस्तू पाठवून त्यांची दिवाळी आनंदी करण्यासाठी पुणे टपाल विभागाने ही जबाबदारी उचलली आहे.
शहरातील सर्व टपाल कार्यालयांमध्ये दिवाळी फराळ परदेशात पाठवण्याची सुविधा आणि तेथे फराळाचे पॅकिंग करण्याची सोय उपलब्ध आहे. टपाल विभागाने मागील वर्षी दिवाळीनिमित्त 21 हजार किलो फराळ पुण्यातून परदेशात वेळेत प्रियजनांपर्यंत पाठवण्याचा विक्रम केला आहे. तसेच दिवाळी निमित्त प्रियजनांना गिफ्ट सुद्धा पार्सलने पाठविता येतील.
पुणे शहरातील जीपीओ, पुणे शहर मुख्य पोस्ट ऑफिस, चिंचवड, ईस्ट, मार्केट यार्ड, पर्वती आणि इतर मोठ्या पोस्ट ऑफिसमध्ये फराळाच्या पदार्थांचे बॉक्सचे पॅकिंग करण्यासाठी उपकरणे बसवण्यात आली आहेत. त्याद्वारे काही मिनिटांत फराळ आणि भेटवस्तूंचे पॅकिंग करून हा बॉक्स लगेच परदेशात पाठविला जाणार आहे.
आज दिनांक 15.10.2026 रोजी पुणे विमानतळ परिसरात कार्गो टर्मिनलमध्ये APTMO PUNE या ठिकाणी नवीन बुकिंग काउंटरचे उद्घाटन पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती प्रीती अग्रवाल आणि डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस श्री. अभिजीत बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले. सदर काउंटर सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत चालू राहील तसेच रविवारी आणि सुट्टीच्या दिवशी सुद्धा कार्यरत राहील.
पुणे क्षेत्राच्या पोस्टमास्टर जनरल श्रीमती प्रीती अग्रवाल आणि डायरेक्टर पोस्टल सर्व्हिसेस श्री. अभिजीत बनसोडे यांनी पुणेकरांना आवाहन केले आहे की या सेवेचा अधिकाधिक पुणेकरांनी लाभ घेऊन दिवाळी फराळ आपल्या नातेवाईकांना आणि मित्र मैत्रिणींना पाठवावा.
आजपासून ते दिवाळी पर्यंत फ्री पिकअपच्या सेवेसाठी 7028007223 व 8421372317 या क्रमांकावर सकाळी 9 ते संध्याकाळी 7 पर्यंत पुणेकर संपर्क करू शकतात.