पर्यटन : शेकडो वर्षांपासूनचे गूढ जपणारे जगातील एकमेव विवर, एकदा तरी पाहावेच असे "लोणार सरोवर" - टॉप न्यूज मराठी

 पर्यटन: शहराच्या  धावपळीपासून दूर, आयुष्यात एकदा तरी पाहावेच असे ठिकाण म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवर. पुण्यापासून जवळपास 380 किलोमीटर अंतरावर असलेले हे ठिकाण लांब असले तरी तिथवरचा प्रवास आणि अनुभव दोन्ही अविस्मरणीय आहे. हे फक्त सरोवर नाही तर शेकडो वर्षांपूर्वी आकाशातून पृथ्वीवर आदळलेल्या एका उल्केमुळे तयार झालेले जगातील एकमेव असे विवर आहे. बेसाल्ट खडकात तयार झालेले हे जगातील तिसरे सर्वात मोठे विवर आहे, त्यामुळे नासा आणि स्मिथसोनियन संस्थेसुद्धा येथे संशोधनासाठी येते.

पुण्यातून अंतर आणि कसे जायचे

पुण्यातून लोणारचे अंतर साधारण 375 ते 390 किलोमीटर आहे. रस्त्याने जाण्यासाठी 7 ते 8 तास लागतात. पुण्यातून जाण्याचा सर्वात सोपा आणि चांगला मार्ग आहे पुणे - अहिल्यानगर - संभाजीनगर - जालना - लोणार. हा संपूर्ण रस्ता राज्य महामार्ग आणि समृद्धी महामार्गाला जोडलेला असल्यामुळे प्रवास सुखकर होतो.

जाण्याच्या सुविधा

स्वतःच्या गाडीने जाणे हा उत्तम पर्याय आहे. पहाटे लवकर निघाल्यास दुपारपर्यंत लोणारला पोहोचता येते. बसने जायचे असल्यास पुणे ते संभाजीनगर किंवा जालनापर्यंत अनेक खाजगी आणि एसटी बस आहेत. तेथून लोणारसाठी पुढे एसटी किंवा खाजगी जीप मिळते. रेल्वेने जायचे असल्यास लोणारचे सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन जालना आहे, जे 90 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्यातून जालनाला रेल्वेने येऊन तेथून टॅक्सी किंवा बसने लोणारला जाता येते. सर्वात जवळचे विमानतळ छत्रपती संभाजीनगर आहे, जे 135 ते 140 किलोमीटर अंतरावर आहे. तेथून टॅक्सीने 3 तासात लोणारला पोहोचता येते.

तिथे गेल्यानंतर काय पाहायचे

लोणार हे फक्त एक तळे नाही, हा एक पूर्ण अनुभव आहे. 1.8 किलोमीटर व्यासाचे आणि 150 मीटर खोल असे हे प्रचंड विवर वरून पाहिल्यावर त्याची भव्यता लक्षात येते. सरोवराचे पाणी खारे आणि अल्कधर्मी आहे, त्याचा रंग कधी हिरवा तर कधी गुलाबी दिसतो.

गोमुख मंदिर हे विवराच्या आत उतरताना लागणारे मंदिर आहे, जिथे सतत गोमुखातून पाणी येते. येथून सरोवराचा सर्वात सुंदर व्ह्यू दिसतो. दैत्यसुदन मंदिर हे चालुक्य काळातील सुमारे 1250 वर्षांपूर्वीचे मंदिर आहे. खजुराहो शैलीतील शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. लोणारमध्ये अशी एकूण 15 प्राचीन मंदिरे आहेत. विवराच्या काठाने 8 किलोमीटरचा फेरफटका मारता येतो. मोर, चिंकारा, घुबड आणि अनेक स्थलांतरित पक्षी येथे दिसतात. रात्री येथे आकाशगंगा स्पष्ट दिसते, त्यामुळे अॅस्ट्रो फोटोग्राफीसाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे.

राहण्याची सोय

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा MTDC रिसॉर्ट हा सर्वात चांगला पर्याय आहे. हा रिसॉर्ट थेट विवराच्या समोर आहे आणि येथून सरोवर दिसते. ऑनलाईन अगोदर बुकिंग करणे आवश्यक आहे. याशिवाय लोणार शहरात 500 ते 1500 रुपयांपर्यंत अनेक खाजगी हॉटेल आणि लॉज आहेत.

जेवण खाण्याची सोय

MTDC रिसॉर्टमध्ये अस्सल महाराष्ट्रीयन थाळी मिळते. पोहे, झुणका भाकर, पिठले हे येथील विशेष पदार्थ. लोणार शहरातील छोट्या हॉटेलमध्ये व्हेज जेवण सहज मिळते. सोबत पाण्याची बाटली आणि थोडी शिदोरी ठेवावी, कारण विवरात उतरल्यानंतर दुकाने नाहीत. लोणारला जाण्यासाठी सर्वात उत्तम वेळ ऑक्टोबर ते फेब्रुवारी आहे. या काळात थंडी असते आणि ट्रेक करणे सोपे जाते. पावसाळ्यात आजूबाजूचा परिसर हिरवागार होतो पण वाटा निसरड्या होतात. स्थानिक गाईड घेणे फायद्याचे ठरते, कारण तो उल्कापाताची वैज्ञानिक माहिती आणि मंदिरांच्या पौराणिक कथा दोन्ही उत्तम सांगतो.