जन्म आणि सुरुवातीचे जीवन
पोपटराव बागुजी पवार यांचा जन्म 1960 साली अहिल्यानगर जिल्ह्यातील हिवरेबाजार या छोट्याशा गावात झाला. हिवरेबाजार हे त्याकाळी दुष्काळग्रस्त आणि अतिशय गरीब गाव म्हणून ओळखले जायचे. 1972 च्या भीषण दुष्काळानंतर गावातून अनेक कुटुंबांनी स्थलांतर केले होते. गावात दारूची दुकाने, जुगार आणि भांडणे यामुळे सामाजिक वातावरण बिघडले होते.
शिक्षण
पोपटराव पवार हे त्यांच्या गावातील एकमेव पदव्युत्तर शिक्षण घेतलेले व्यक्ती होते. त्यांनी अहिल्यानगर येथील न्यू आर्ट्स अँड सायन्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी म्हणजे M Com पूर्ण केले. शिक्षण घेत असताना ते क्रिकेटमध्येही चमकले होते आणि त्यांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता. त्यांना शहरात चांगली नोकरी मिळू शकली असती, पण त्यांनी गावाकडे परत येण्याचा निर्णय घेतला.
फॅमिली बॅकग्राउंड
पोपटराव पवार हे शेतकरी कुटुंबातून येतात. त्यांचे कुटुंब पारंपरिक शेतीवर अवलंबून होते. त्यांचे वडील बागुजी पवार हे देखील शेतकरी होते. त्यांच्या कुटुंबाने त्यांना शिक्षणासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले. त्यांच्या पत्नी आणि मुलांनीही गावाच्या विकास कार्यात त्यांना कायम साथ दिली आहे. त्यांनी स्वतःचे जीवन साधे ठेवले आणि संपूर्ण वेळ गावासाठी दिला.
सामाजिक कार्य - हिवरेबाजारचा कायापालट
1989 साली गावातील तरुणांनी आग्रह केल्यामुळे पोपटराव पवार यांनी सरपंच पदाची निवडणूक लढवली आणि 1990 साली ते बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले. सरपंच झाल्यावर त्यांनी पहिले काम गावातील 22 दारूची दुकाने बंद करण्याचे केले.
त्यांनी अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धी मॉडेलपासून प्रेरणा घेऊन काम सुरू केले. त्यांनी गावात पाच कलमी कार्यक्रम राबवला.
1. जलसंधारण - 1994 ते 1995 मध्ये त्यांनी श्रमदानातून 52 मातीचे बंधारे, 33 दगडी बंधारे, 2 पाझर तलाव आणि 9 चेक डॅम बांधले. यामुळे गावातील पाणीपातळी वाढली.
2. वनसंवर्धन - संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केले. आज गावात घनदाट जंगल आहे.
3. शिक्षण - गावातील शाळा जी फक्त चौथीपर्यंत होती ती दहावीपर्यंत केली. शाळा दोन महिने बंद ठेवून सरकारकडून चांगले शिक्षक आणले.
4. सामाजिक सुधारणा - कुटुंब नियोजन, दारूबंदी, गुटखाबंदी, शौचालयाचा वापर यासाठी ग्रामसभा घेतल्या. हिवरेबाजारमध्ये आज एकही डास नाही, एक डास दाखवा आणि 100 रुपये घेऊन जा, असे ते म्हणतात.
5. शेतीत बदल - पाणी जास्त लागणारे पीक बंद करून फळे, भाजीपाला, फुले आणि कमी पाणी लागणाऱ्या पिकांना प्रोत्साहन दिले. दुग्धव्यवसाय वाढवला.
या कामामुळे हिवरेबाजार हे देशातील सर्वात श्रीमंत गाव बनले. एकेकाळी दरडोई उत्पन्न 832 रुपये होते ते 28 हजार रुपयांपेक्षा जास्त झाले. गावात आज 60 पेक्षा जास्त करोडपती शेतकरी आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
त्यांच्या कार्याची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर घेतली गेली आहे.
2007 साली हिवरेबाजार ग्रामपंचायतीला सामुदायिक जलसंधारणासाठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला.
महाराष्ट्र शासनाचा कृषी रत्न पुरस्कार
इंडिया टुडे मासिकाने त्यांना कव्हर स्टोरी केली होती.
2020 साली भारत सरकारने त्यांना सामाजिक कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले.
सध्या ते महाराष्ट्र शासनाच्या आदर्श गाव योजनेचे कार्यकारी संचालक म्हणून काम पाहतात आणि संपूर्ण महाराष्ट्रात हिवरेबाजार मॉडेल राबवण्यासाठी मार्गदर्शन करतात.