मुंबई : दृकश्राव्य माध्यमांमध्ये समान भाषेतील उपशीर्षके उपलब्ध झाल्यामुळे भाषेचे आकलन आणि वाचन वाढण्यास मदत होईल. या उपक्रमामुळे निश्चितच भाषा शिक्षणाला गती येईल, असा विश्वास माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रधान सचिव व महासंचालक ब्रिजेश सिंह यांनी व्यक्त केला.
वरळी येथील दूरदर्शन केंद्रात प्लॅनेट रीड मराठी समान भाषा उपशीर्षक केंद्राचा शुभारंभ सिंह यांच्या हस्ते फित कापून करण्यात आला. त्यानंतर दूरदर्शन केंद्रातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी दूरदर्शन केंद्र मुंबईचे उपसंचालक हेमंत देसाई, गणेश अय्यर आणि आयआयटी दिल्लीचे सहाय्यक प्राध्यापक तथा बिलियन रीडर्सचे प्रमुख प्रा. ब्रिज कोठारी उपस्थित होते.
या उपक्रमांतर्गत दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील मराठी मनोरंजन कार्यक्रमांमध्ये मराठी भाषेतून देवनागरी लिपीत उपशीर्षके देण्यात येणार आहेत. यामुळे कार्यक्रम पाहणाऱ्या प्रत्येकाचे मराठी वाचन होणार आहे. मराठी भाषा वाचनाला यामुळे चालना मिळेल. विद्यार्थी तसेच श्रवणदिव्यांगांना याचा मोठा लाभ होईल. अशा प्रकारे प्रादेशिक भाषेतून उपशीर्षके देण्याच्या या उपक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महाराष्ट्रातून झाली आहे.
या उपक्रमाची सुरुवात राज्य शासन, प्रसार भारती, आयआयटी दिल्ली आणि प्लॅनेट रीड यांच्या वतीने करण्यात आली आहे.
प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले, या अभिनव उपक्रमामुळे श्रवणदिव्यांग व्यक्तींनाही कथा, कथानक आणि पटकथेतील घडामोडी समजून घेता येतील. लिखित शब्दाचे महत्व जपणाऱ्या या उपक्रमाची सुरुवात महाराष्ट्रातून होत आहे, ही आनंदाची बाब आहे.
मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे. दैनंदिन व्यवहारात भाषा बोलणाऱ्या अनेकांना लिखित भाषेचे संपूर्ण विश्व उपलब्ध होत नाही. त्यामुळे लिखित शब्दाचे महत्त्व हरवू देता कामा नये. समान भाषेतील उपशीर्षके हा त्यासाठीचा सोपा आणि परिणामकारक तंत्रज्ञानाधारित उपाय आहे, असेही सिंह म्हणाले.
नागरिकांचा पडद्यावरील वेळ वाढत असताना त्याच पडद्यावर समान भाषेतील उपशीर्षके उपलब्ध झाल्यास आशयाच्या संदर्भासह भाषा सहजपणे शिकता येते. उपशीर्षकांमुळे प्रेक्षकांचे भाषेशी नाते अधिक दृढ होऊन भाषेचे आकलनही वाढते. विशेषतः श्रवणदिव्यांग व्यक्तींना पडद्यावरील कथा आणि घटनाक्रम समजण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरेल, असेही सिंह यांनी सांगितले.