सर्वसामान्यांना दिलासा मिळणार, कच्च्या तेलाचे दर घसरले, पेट्रोल डिझेल लवकरच स्वस्त होण्याची शक्यता - टॉप न्यूज मराठी

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाल्यामुळे भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही दिवसांपासून ब्रेंट क्रूडच्या किमतीत चढ उतार सुरू होता, मात्र आता दर 103 डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया अतिरिक्त डिझेल पुरवठा करणार असल्याचे आणि रशिया युक्रेनमध्ये ऊर्जा युद्धविरामाचा प्रस्ताव असल्याचे जाहीर केल्यामुळे किमतीत ही घसरण पाहायला मिळाली आहे.

भारतात सध्या पेट्रोल डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोल 111.21 रुपये आणि डिझेल 97.83 रुपये प्रति लिटर आहे, तर दिल्लीत पेट्रोल 102.12 आणि डिझेल 95.20 रुपये आहे. सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या काही महिन्यांपासून दरात बदल केलेला नाही. मात्र आयसीआरए या संस्थेच्या अंदाजानुसार कंपन्यांना पेट्रोलवर प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवर 9 रुपये तोटा सहन करावा लागत आहे, ज्यामुळे रोज सुमारे 530 कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.

कच्च्या तेलाचे दर जर असेच कमी राहिले तर केंद्र सरकार आणि तेल कंपन्या लवकरच पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेऊ शकतात. भारत आपल्या गरजेच्या 90 टक्के कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे आंतरराष्ट्रीय दर कमी झाले की थेट फायदा भारतीय ग्राहकांना होतो.

तज्ज्ञांच्या मते दिवाळीच्या आधी जर किमती 100 डॉलरच्या खाली आल्या तर तेल कंपन्यांकडून 2 ते 3 रुपयांपर्यंत कपात केली जाऊ शकते. त्यामुळे वाहनधारक आणि शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे.