मोठी बातमी : मतमोजणीचा व्हिडिओच गायब! सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला फटकारले - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगावर तीव्र नाराजी व्यक्त केली असून आयोगाला पुढील सुनावणीपर्यंत मूळ रेकॉर्ड सादर करण्याचा अल्टिमेटम दिला आहे, अन्यथा प्रतिकूल निष्कर्ष काढण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेस नेते टीडी राजेगौडा आणि भाजप नेते डीएन जीवराज यांच्या निवडणूक वादाच्या याचिकेवर सुनावणी सुरू होती. या प्रकरणात फेरमतमोजणीच्या मूळ व्हिडिओ रेकॉर्डिंगबाबत न्यायालयाने माहिती मागितली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाच्या वकिलाने मूळ व्हिडिओ रेकॉर्डिंग सापडत नसल्याचे न्यायालयाला सांगितले. या उत्तरावर न्यायालयाने संताप व्यक्त केला.

निवडणूक घेणे हे आयोगाचे मुख्य काम आहे आणि त्यासंबंधीचे दस्तऐवज सुरक्षित ठेवणे ही त्यांचीच जबाबदारी आहे. आमच्याकडील रेकॉर्ड गहाळ झाले असे आयोग कसे म्हणू शकते, असा सवाल न्यायालयाने केला. जेव्हा संबंधित रेकॉर्ड निवडून आलेल्या उमेदवाराला दिला होता, तर तो सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था का केली नाही, अशी विचारणाही करण्यात आली.

आम्ही रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहोत, असे आयोगाने सांगितल्यावर न्यायालयाने म्हटले की, निवडणूक प्रक्रियेशी संबंधित कागदपत्रांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्या गोष्टी वाऱ्यावर सोडता येणार नाहीत. उपलब्ध असलेले सर्व रेकॉर्ड पुढील तारखेपर्यंत सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत.