पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेऊन पुणे जिल्ह्यातून इतर कोणत्याही जिल्ह्यात किंवा राज्याबाहेर चारा नेण्यास बंदी घालण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी याबाबत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार जिल्ह्यातून सर्व प्रकारचा सुका आणि ओला चारा, कडबा, कुट्टी आणि पेंढा यांची वाहतूक आणि विक्री करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
खरीप हंगाम 2026 च्या पार्श्वभूमीवर जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता टिकवून ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात तयार होणारा चारा इतर जिल्ह्यात आणि सीमावर्ती भागात मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी पाठवला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात चारा टंचाई निर्माण होऊन पशुधनाच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता 2023 मधील कलम 223 नुसार कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र शासकीय योजना, पशुसंवर्धन विभाग किंवा जिल्हा प्रशासनाने अधिकृत मंजुरी दिलेल्या चारा वाहतुकीला या बंदीतून सूट देण्यात आली आहे.
हा आदेश पुढील आदेश येईपर्यंत लागू राहणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.