राज्यात चारा टंचाईचे संकट, सरकारचे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ सुरू - टॉप न्यूज मराठी

पुणे : राज्यातील काही भागात पावसाची तूट आणि खरीप पिकांचे नुकसान झाल्याने आगामी काळात जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभागाने आत्तापासूनच तयारी सुरू केली असून राज्यभरात ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी सर्व जिल्ह्यांना याबाबत सूचना दिल्या आहेत. टंचाई आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आत्ताच उपलब्ध असलेल्या चाऱ्याचे जतन करणे, त्यावर प्रक्रिया करणे आणि पर्यायी चारा तयार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात शेतकऱ्यांना काय शिकवले जाणार -

1.  ज्वारी, बाजरी, मका, गहू, तूर यांचा कडबा, भुसा आणि पेंढा जाळून न टाकता त्याचे योग्य संकलन आणि साठवणूक कशी करावी. पावसापासून आणि बुरशीपासून त्याचे संरक्षण कसे करावे याचे प्रात्यक्षिक दाखवले जाईल.

2.  निकृष्ट चाऱ्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी युरिया प्रक्रिया कशी करायची आणि चारा वाया जाऊ नये म्हणून कडबाकुट्टी यंत्राचा वापर कसा करावा याचे प्रशिक्षण दिले जाईल.

3.  हिरवा चारा उपलब्ध असतानाच त्यापासून मुरघास कसा तयार करावा, कमी खर्चात हायड्रोपोनिक पद्धतीने आणि अझोला बेडद्वारे हिरवा चारा कसा तयार करावा यावर भर दिला जाणार आहे.

4.  धरणे आणि तलावांचे पाणी ओसरल्यानंतर गाळाच्या जमिनीत चारा पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरवले जाणार आहे.

हे अभियान गावपातळीवर राबवले जाणार आहे. पशुवैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी गावोगावी जाऊन बैठक आणि मेळावे घेतील. यासाठी घडीपत्रिका, माहितीपत्रके, रेडिओ, व्हॉट्सअॅप ग्रुप आणि लघुपटांच्या माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या तज्ज्ञांचीही मदत घेतली जाणार आहे. प्रत्येक स्तरावर जबाबदारी निश्चित केली आहे. गाव पातळीवर पशुवैद्यकीय अधिकारी, तालुका पातळीवर तालुका पशुसंवर्धन अधिकारी आणि जिल्हा पातळीवर जिल्हा उपआयुक्त यांच्यावर देखरेखीची जबाबदारी असेल. उपलब्ध चारा सुरक्षित ठेवा, पीक अवशेष जाळू नका आणि या अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने सर्व शेतकरी आणि पशुपालकांना केले आहे.