हॉलीवुड मधील प्रसिद्ध 'विशेष' अभिनेत्याचे निधन, चाहत्यांमधून हळहळ व्यक्त! ब्रेकिंग बॅड सिरीजमधील विशेष मुलाचे गाजवले होते पात्र - टॉप न्यूज मराठी

हॉलीवुड मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. लोकप्रिय अमेरिकन सीरिज ब्रेकिंग बॅड मधील अभिनेता आरजे मिट्टे याचे वयाच्या 34 व्या वर्षी निधन झाले आहे. त्याच्या प्रतिनिधींनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. 12 ऑक्टोबर 2026 रोजी टेक्सास मधील ब्राउन्सविल येथील त्याच्या निवासस्थानी त्याला मृत घोषित करण्यात आले. मृत्यूच्या नेमक्या कारणाबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही आणि शवविच्छेदनानंतरच अधिक स्पष्टता येईल असे स्थानिक प्रशासनाने सांगितले आहे.

आरजे मिट्टे याने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात 2006 मध्ये केली होती. त्याला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती 2008 ते 2013 दरम्यान आलेल्या ब्रेकिंग बॅड या गाजलेल्या सीरिजमधून. यामध्ये त्याने वॉल्टर व्हाइट ज्युनियर म्हणजेच फ्लिन ही भूमिका साकारली होती. ही सीरिज आजही सर्वोत्कृष्ट टीव्ही शोपैकी एक मानली जाते. याशिवाय त्याने स्विच्ड अॅट बर्थ, गार्डियन्स ऑफ जस्टिस, टाइम शेअर, द ओक रूम आणि ट्रायम्फ सारख्या चित्रपट आणि सीरिजमध्ये काम केले होते. ट्रायम्फ या चित्रपटात त्याने केवळ अभिनयच नाही तर कार्यकारी निर्माता म्हणूनही काम पाहिले होते.

आरजे मिट्टे हा एक विशेष अभिनेता होता. वयाच्या तीन वर्षी त्याला सेरेब्रल पाल्सी असल्याचे निदान झाले होते. स्वतःच्या या अनुभवाचाच त्याने ब्रेकिंग बॅड मधील भूमिकेसाठी उपयोग केला आणि त्या पात्राला अधिक वास्तववादी बनवले. त्याने आपल्या 34 वर्षांच्या आयुष्यात दिव्यांग व्यक्तींच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठवला. तो स्क्रीन अॅक्टर्स गिल्डमध्ये दिव्यांग कलाकारांसाठी प्रवक्ता म्हणून काम करत होता. तसेच युनायटेड सेरेब्रल पाल्सी आणि श्रायनर्स चिल्ड्रन्स या संस्थांसाठी अॅम्बेसेडर म्हणून कार्यरत होता. त्याने द मिट्टे फाउंडेशन या संस्थेची स्थापना करून समाजात दिव्यांग व्यक्तींना समान संधी आणि योग्य प्रतिनिधित्व मिळावे यासाठी प्रयत्न केले.

या तरुण आणि उमद्या अभिनेत्याच्या अकाली निधनाने हॉलीवुडसह जगभरातील चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याचा शेवटचा व्हिडीओ त्याने 7 ऑक्टोबर रोजी शेअर केला होता, ज्यामध्ये त्याने ब्रेकिंग बॅड मधील व्हाइट कुटुंबाच्या कथेबद्दल आपले मत मांडले होते. त्याच्या निधनानंतर ब्रायन क्रॅन्स्टन आणि डीन नॉरिस यांसारख्या सहकलाकारांनी सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली आहे.