मोठी बातमी : जंतरमंतरवर पुन्हा गोंधळ, सीजेपीच्या तीन नेत्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, परिसरात तणाव - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : दिल्लीच्या जंतरमंतर परिसरात आज पुन्हा एकदा राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्ली पोलिसांनी कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच सीजेपीच्या तीन नेत्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये सौरव दास, अजिंक्य शिंदे आणि आशुतोष रांका यांचा समावेश आहे. हे तिघे आपल्या काही समर्थकांसह जंतरमंतर येथे पोहोचले होते, त्यावेळी पोलिसांनी कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले. या परिसरात सध्या जमावबंदी लागू आहे आणि गृहमंत्रालयाकडून या ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे, असे असतानाही हे नेते तिथे आल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे सांगण्यात येत आहे.

या कारवाईचा एक व्हिडीओ आशुतोष रांका आणि सीजेपीच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये सीजेपीचे कार्यकर्ते हातात झेंडे घेऊन घोषणा देताना दिसत आहेत. त्यानंतर पोलीस त्यांना ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे सरकारने आंदोलनासाठी अधिकृत असलेल्या ठिकाणांच्या यादीतून जंतरमंतरचे नाव वगळल्याने सीजेपीने यावर नाराजी व्यक्त केली आहे. पक्षाचे नेते अभिजीत दीपके यांनी यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार घाबरले आहे म्हणूनच त्यांनी जंतरमंतरचे नाव यादीतून काढले आहे, पण यामुळे आंदोलन थांबणार नाही, असे दीपके यांनी म्हटले आहे.

पार्श्वभूमी काय आहे

10 ऑक्टोबर रोजी सीजेपीने जंतरमंतरवर मोठे आंदोलन करण्याची घोषणा केली होती. त्या दिवशी दिल्ली पोलिसांनी विमानातच जाऊन अभिजीत दीपके, सौरव दास आणि आशुतोष रांका यांना ताब्यात घेतले होते. त्या दोन दिवसांच्या काळात पोलिसांनी सात हजारांहून अधिक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचा दावा करण्यात आला होता, नंतर त्या सर्वांना सोडून देण्यात आले. नेत्यांना ताब्यात घेऊनही जंतरमंतरवर मोठ्या संख्येने तरुणांनी एकत्र येत आंदोलन केले होते, त्यावेळीही पोलिसांनी अनेकांना ताब्यात घेतले होते. त्याच घटनेचा पुढचा भाग म्हणून आज पुन्हा एकदा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.