रंजक रोचक : कोडिन्ही गाव, जिथे प्रत्येक घरात जुळे जन्मतात, भारतातील जुळ्यांचे गाव - टॉप न्यूज मराठी

रंजक रोचक : केरळच्या मल्लापुरम जिल्ह्यात कोडिन्ही नावाचे एक छोटेसे गाव आहे. बाहेरून पाहिले तर हे गाव इतर गावांसारखेच वाटते, पण या गावात गेल्यावर तुम्हाला सारखे चेहरे सर्वत्र दिसतील. शाळेत, बाजारात, दुकानात जुळे जोडपे दिसणे ही येथे सामान्य गोष्ट आहे. म्हणूनच या गावाला भारताचे ट्विन टाऊन म्हटले जाते.

या गावात सुमारे 2000 कुटुंबे राहतात आणि अंदाजे 400 ते 550 जुळ्यांच्या जोड्या आहेत. भारतात सर्वसाधारणपणे 1000 जन्मामागे 4 ते 9 जुळे जन्मतात. तर जगात हा दर 1000 मागे 8 आहे. पण कोडिन्ही गावात 1000 जन्मामागे 42 ते 45 जुळे जन्मतात. हा दर देशाच्या सरासरीपेक्षा सहा पटीने जास्त आहे.

ही घटना गेल्या 60 ते 70 वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी नवीन जुळ्यांचा जन्म होतो. 2011 ते 2016 या पाच वर्षातच 60 जुळ्यांच्या जोड्या जन्माला आल्या होत्या. या गावात दोन ट्रिपलेट्सच्या जोड्याही आहेत.

या घटनेचे सर्वात मोठे गूढ म्हणजे याचे कारण अजूनही सापडलेले नाही. अनेक भारतीय आणि परदेशी शास्त्रज्ञांनी येथे संशोधन केले आहे. पाणी, हवा, आहार, जनुके या सर्व गोष्टी तपासल्या गेल्या. पण कोणताही ठोस पुरावा मिळाला नाही. काही लोक पाण्याच्या रचनेमुळे असे होते असे म्हणतात, पण ते सिद्ध झालेले नाही.

आणखी एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे कोडिन्ही गावातील ज्या महिला लग्न होऊन दुसऱ्या गावात जातात, त्यांनाही जुळे होतात. यामुळे जनुकीय कारण असावे असा अंदाज लावला जातो, पण त्यालाही अजून वैज्ञानिक आधार मिळालेला नाही.

या गावात दरवर्षी जुळ्यांचा मेळावाही भरवला जातो. या गूढ गावामुळे कोडिन्ही आज जगभर प्रसिद्ध झाले आहे.