पुणे : सध्याच्या आधुनिक युगामध्ये पाश्चिमात्य चालीरितींचा प्रभाव असल्याने आपल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्ती आणि संस्कारित समूहगीतांची सातत्याने उजळणी करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी नुकतेच येथे केले. भारत विकास परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतस्तरीय राष्ट्रीय समूहगान स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी परिषदेचे पदाधिकारी दत्ता चितळे, सचिन परांजपे, राजेंद्र जोग आणि शिवाजीनगर शाखेचे अध्यक्ष देवदत्त चंदावरकर व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेली इनामदार पुढे म्हणाले की, समूहगान करताना विद्यार्थ्यांची सर्वांना बरोबर घेऊन एका सुरात गाण्याची सवय महत्वाची ठरते. गायकांचे स्वरच फक्त एकरूप होतात असे नाही, तर स्वरांबरोबरच सर्वांचे श्वाससुद्धा एकात्म भावनेने ऊर्जा निर्माण करतात. मी संगीत क्षेत्रात काम करीत असल्यामुळे असे अनुभवाला येते की, लहानपणी विद्यार्थ्यांच्या मुखात जे गीत प्रचलित होते आणि गुणगुणले जाते, त्या गीताचे भाव आणि विचार आयुष्यभर त्या विद्यार्थ्याला देशभक्तीची सतत जाणीव करून देतात. असे उपक्रम सर्व स्तरावर होण्याची गरज आहे.
हिंदी व संस्कृत भाषेत झालेल्या या समूहगान स्पर्धेमध्ये एकूण १४ शाळांच्या संघांनी भाग घेतला होता. हिंदी गीतांच्या स्पर्धेत पुण्यातील सिम्बायोसिस प्रशालेने तर संस्कृत गीतांच्या स्पर्धेत सांगलीच्या पोतदार इंटरनॅशनल संघाने प्रथम क्रमांक पटकावला व हा संघ अहमदाबाद येथे होणाऱ्या क्षेत्रीय स्पर्धांसाठी पात्र ठरला आहे. हिंदी भाषेतील द्वितीय क्रमांक अमृता विद्यालय, निगडी, तृतीय क्रमांक कवठेकर प्रशाला, पंढरपूर तर संस्कृत भाषेतील द्वितीय क्रमांक आदर्श शाळा, नाशिक, तृतीय क्रमांक सिम्बायोसिस प्रशाला, पुणे यांना मिळाला. या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पांडुरंग मुखडे, तुषार रिठे आणि संगीता माटे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया दांडेकर यांनी केले.