पुणे : मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्या वर्षात पुणे जिल्हा परिषदेने मोठी कामगिरी केली आहे. या अभियानात पुणे जिल्हा परिषदेने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक मिळविला आहे. तर पुरंदर तालुक्यातील आडाचिवाडी ग्रामपंचायतीने संपूर्ण राज्यात प्रथम क्रमांक पटकावून पुणे जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
या अभियानात जिल्ह्यातील 276 ग्रामपंचायतींनी सक्रिय सहभाग नोंदविला होता.
ग्रामपंचायतींचे आर्थिक सक्षमीकरण, महिला बचत गटांना प्रोत्साहन, सामाजिक सुरक्षा योजना, जलस्रोतांचे बळकटीकरण, पर्यावरण संवर्धन आणि रोजगार निर्मिती या प्रमुख बाबींवर या अभियानात भर देण्यात आला होता.
1. करवसुली आणि लोकसहभाग - अभियानांतर्गत जिल्ह्यातील ग्रामपंचायतींनी सुमारे 245 कोटी रुपयांची थकीत करवसुली केली आहे. तर विकासकामांसाठी 7.97 कोटी रुपयांची लोकवर्गणी जमा झाली आहे. 4,995 दिव्यांग व्यक्तींना UDID कार्ड उपलब्ध करून देण्यात आले असून 16,389 लाभार्थ्यांना सामाजिक अर्थसहाय्य योजनांचा लाभ देण्यात आला.
2. महिला सक्षमीकरण - जिल्ह्यात 11,092 नवीन महिला बचत गट स्थापन करण्यात आले, तर 5,147 बचत गटांना खेळते भांडवल देण्यात आले. विशेष म्हणजे या अभियानामुळे 60,833 महिलांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा अधिक झाले आहे.
3. रोजगार आणि पर्यावरण - रोजगार हमी योजनेतून 1,65,274 मनुष्यदिन रोजगार निर्मिती करण्यात आली. पर्यावरण संवर्धनासाठी 734 जलस्रोतांचे बळकटीकरण, 5,244 सौर कृषिपंप आणि तब्बल 7,12,587 वृक्षांची लागवड करण्यात आली.
4. मूलभूत सुविधा - ग्रामीण भागातील 651 शाळा, 846 अंगणवाडी केंद्रे आणि 154 पशुवैद्यकीय दवाखाने सक्षम करण्यात आले. युवकांसाठी जिल्ह्यात 230 खुल्या व बंदिस्त व्यायामशाळा उभारण्यात आल्या.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर वॉर रूम स्थापन करण्यात आली होती. ‘समृद्ध दिवाळी’, ‘समृद्ध पाडवा’, ‘एक दिवस समृद्धीसाठी’ आणि ‘कॉफी विथ सीईओ’ यासारख्या हटके उपक्रमांमुळे लोकांचा सहभाग वाढला.
या यशामुळे पुणे जिल्हा परिषदेच्या कामाचे राज्यभरात कौतुक होत आहे.