व्यक्तीविशेष : लावणी सम्राज्ञी ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचा कला जगतातील जीवनप्रवास... - टॉप न्यूज मराठी

व्यक्तिविशेष : आज मराठी कला विश्वासाठी अत्यंत दुःखद दिवस आहे. ज्या आवाजाने, ज्या नृत्याने आणि ज्या अभिनयाने गेली चार दशके महाराष्ट्राला वेड लावले, त्या लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांनी आज अखेरचा श्वास घेतला. पुण्यात दीर्घ आजाराने वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. तमाशाच्या फडातून सुरू झालेला त्यांचा प्रवास चित्रपटाच्या रुपेरी पडद्यापर्यंत पोहोचला आणि तिथेही त्यांनी आपली अमिट छाप सोडली.

बालपण आणि संघर्ष

मधु कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. कोल्हाटी समाजातील कलावंत कुटुंबात जन्म झाल्यामुळे लोककला त्यांच्या रक्तातच होती. पण हे बालपण सोपे नव्हते. गरिबीने पाचवीला पुजलेले घर, शिक्षणाची ओढ असूनही पोटासाठी लहान वयातच तमाशाच्या फडात काम करण्याची वेळ आली. शाळेची वाट सोडून त्यांनी रंगमंचाला आपली शाळा बनवले. त्याच ठिकाणी त्यांनी कथ्थक नृत्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेतले आणि लावणीला नवी ओळख दिली.

कलेच्या विश्वात पदार्पण

1973 हे वर्ष त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे ठरले. मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमध्ये त्यांनी व्यावसायिक मंचावर पहिली लावणी सादर केली आणि प्रेक्षकांनी त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यानंतर दादू इंदुरीकर यांच्या गाढवाचं लग्न या अजरामर वगनाट्यातील त्यांची भूमिका प्रचंड गाजली. भानगडीशिवाय पुढारी नाही, विच्छा माझी पूरी करा अशा नाटकांनी त्यांना रंगभूमीची राणी बनवले.

चित्रपटसृष्टीतील कारकीर्द

लोककलेतून त्या चित्रपटांकडे वळल्या पण त्यांनी कधीही ग्लॅमरस भूमिकांचा मागे धाव घेतली नाही. त्यांनी नेहमी मातीतल्या, मायेच्या भूमिका निवडल्या. आई, सासू, काकू, गावातली ठसकेबाज बाई या भूमिकांमध्ये त्या इतक्या सहज वावरायच्या की ती व्यक्तिरेखा खरीच आहे असे वाटायचे. 1977 ते 2015 या काळात त्यांनी 75 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सतीची पुण्याई, शापित, एक होता विदूषक, झपाटलेला, बिनकामाचा नवरा, माझा छकुला, ह्योच नवरा पाहिजे, हेच माझं माहेर, मुक्ता, राजा पंढरीचा, गोष्ट छोटी डोंगराएवढी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट.

पुरस्कार

त्यांच्या अभिनयाची दखल अनेक पुरस्कारांनी घेतली गेली. शापित या चित्रपटातील भूमिकेसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाचा राज्य चित्रपट पुरस्कार आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कार मिळाला होता. लोककलेतील योगदानाबद्दल त्यांना अनेक सन्मान मिळाले. 2018 मध्ये झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्या सोहळ्याला उपस्थित राहू शकल्या नाहीत, त्यांच्या सुनेने त्यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला होता.

27 नोव्हेंबर 2016 रोजी माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात लावण्य संगीत कार्यक्रमात लावणी सादर करत असताना त्या रंगमंचावरच कोसळल्या. त्यांना मेंदूचा पक्षाघात झाला होता. शस्त्रक्रिया झाली पण त्यानंतर त्या कायमच्या अंथरुणाला खिळून राहिल्या. गेली दहा वर्षे त्यांचा कलेपासूनचा हा विरह सुरू होता आणि आज त्यांनी कायमचा निरोप घेतला.

मधु कांबीकर गेल्या असल्या तरी त्यांनी पेटवलेला लोककलेचा दिवा कधीच विझणार नाही. त्यांच्या घुंगराचा आवाज, त्यांच्या लावणीचा ठसका आणि त्यांच्या अभिनयातील मायेचा ओलावा मराठी मनात कायम जिवंत राहील.