मुंबई : मराठी मनोरंजन विश्वावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे. ज्येष्ठ अभिनेत्री आणि लावणी सम्राज्ञी मधु कांबीकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 73 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यात दीर्घ आजाराने त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टी, रंगभूमी आणि लोककला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मधु कांबीकर यांचा जन्म 28 जुलै 1953 रोजी बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर 1973 मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांच्या कलाप्रवासाला खरी सुरुवात झाली. आपल्या बहारदार लावणीने त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले होते.
त्यांनी चार दशकांहून अधिक काळ मराठी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. गाढवाचं लग्न, विच्छा माझी पूरी करा, वस्त्रहरण, बिनकामाचा नवरा, एक होता विदूषक, शापित, झपाटलेला, माझा छकुला, सतीची पुण्याई, ह्योच नवरा पाहिजे अशा 75 हून अधिक चित्रपट आणि अनेक नाटकांमध्ये त्यांनी काम केले. आई, सासू अशा कौटुंबिक भूमिकांमध्ये त्या विशेष गाजल्या. शापित चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर मराठी आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार मिळाला होता. 2018 मध्ये त्यांना झी चित्र गौरव जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
2016 मध्ये त्यांच्या आयुष्याला वेगळे वळण लागले. 27 नोव्हेंबर 2016 रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिरात लावण्य संगीत या कार्यक्रमात लावणी सादर करत असताना त्या रंगमंचावरच बेशुद्ध पडल्या. त्यांना पक्षाघाताचा मोठा झटका आला होता. मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्याचे निदान झाले. शस्त्रक्रिया यशस्वी झाली पण त्यानंतर त्या अंथरुणाला खिळून होत्या. तेव्हापासून त्या अभिनयापासून दूर होत्या.
आज सकाळी पुण्यात त्यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या जाण्याने लोककलेतील एक तेजस्वी तारा हरपला आहे अशा भावना कलाविश्वातून व्यक्त होत आहेत.