दिल्लीत राजकीय घमासान ! ममता बॅनर्जी देखील पोलिसांच्या ताब्यात; निवडणूक आयोगाविरोधातील निदर्शनांपूर्वीच अनेक नेते पोलिसांच्या ताब्यात - टॉप न्यूज मराठी

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आज सकाळपासून तणावाचे वातावरण आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीने आज मोठ्या आंदोलनाची हाक दिली होती. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी विविध पक्षांचे नेते दिल्लीत दाखल होत असताना पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीजेपीच्या या आंदोलनाला गालबोट लागावे म्हणून दिल्ली पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. हजारो पोलिस कर्मचारी रस्त्यावर उतरवण्यात आले आहेत. तसेच विमानतळावरच कारवाई करत पोलिसांनी सीजेपीचे प्रमुख नेते अभिजीत दीपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्यानंतर या आंदोलनाची जबाबदारी अजिंक्य शिंदे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे.

दरम्यान या घडामोडीत मोठी अपडेट म्हणजे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्या आजच्या या आंदोलनात सहभागी होणार असल्याची चर्चा होती. दिल्लीतील निवासस्थानाबाहेरच त्यांना दिल्ली पोलीस आणि सीआरपीएफच्या जवानांनी ताब्यात घेतले. त्यांच्यासोबत तृणमूलचे माजी खासदार साकेत गोखले आणि इतर पाच नेत्यांना सुद्धा ताब्यात घेण्यात आले आहे.

ताब्यात घेतल्यानंतर साकेत गोखले यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली. आम्हाला पोलिस व्हॅनमध्ये बसवून कुठेतरी घेऊन जात आहेत. हे लोकशाहीला धरून नाही असा आरोप त्यांनी केला आहे.

दुसरीकडे दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आम आदमी पक्षाचे काही नेते जंतर मंतरवर होणाऱ्या या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पोहोचणार आहेत. त्यामुळे आता पुढे काय घडणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.