आशिया खंडात पुन्हा एकदा मोठ्या युद्धाची शक्यता निर्माण झाली आहे. चीन आणि तैवानमधील तणाव आता शिगेला पोहोचला आहे. या प्रकरणात आता अमेरिकेने थेट उडी घेतली असून चीनला कडक इशारा दिला आहे.
गेल्या काही दिवसांपासून चीनच्या नौदलाच्या बोटी तैवानच्या पूर्व किनाऱ्यावर सतत गस्त घालत आहेत. ऑगस्ट महिन्यात पहिल्यांदाच चीनची एक मिलिशिया बोट, म्हणजे लष्करासारखी दिसणारी पण सामान्य मच्छिमारांच्या वेशातील बोट तैवानच्या हद्दीत दिसली होती. तेव्हापासून चीनने आपल्या बोटींची संख्या वाढवली आहे.
तैवानचे म्हणणे आहे की चीन आम्हाला चारही बाजूने घेरून आमचा श्वास गुदमरवण्याचा प्रयत्न करत आहे. भविष्यात युद्ध झाल्यास आम्हाला बाहेरून मदत मिळू नये म्हणून चीन आमच्या पूर्व किनाऱ्याचा रस्ता बंद करण्याचा सराव करत आहे.
यावर अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने काल रात्री प्रतिक्रिया दिली आहे. अमेरिकेने म्हटले आहे की तैवानच्या पूर्वेला चीन जे काही करत आहे ते अत्यंत धोकादायक आणि अस्थिर करणारे आहे. तैवान गेली 70 वर्षे शांततेत ज्या भागाचे प्रशासन करत आहे, तिथे चीनने दादागिरी करू नये. चीनने तणाव वाढवू नये आणि तैवानच्या लोकांनी निवडून दिलेल्या सरकारशी चर्चा करावी.
दुसरीकडे तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग-ते यांनी देखील मोठे वक्तव्य केले आहे. त्यांनी म्हटले आहे की आम्हाला युद्ध नको आहे म्हणूनच आम्ही आमचा संरक्षण खर्च वाढवत आहोत. आम्ही शांतताप्रिय देश आहोत पण आमच्यावर हल्ला झाला तर आम्ही तयार आहोत.
चीन तैवानला स्वतःचाच एक भाग मानतो तर तैवान स्वतःला स्वतंत्र देश मानतो. अमेरिकेने अजूनही तैवानला 14 अब्ज डॉलरचे शस्त्र विक्रीचे पॅकेज दिलेले नाही, त्यावरूनही चर्चा सुरू आहे. चीनच्या या कुरापतींमुळे संपूर्ण जगाचे लक्ष आता तैवानकडे लागले आहे.