९ व १० ऑक्टोबर दरम्यान तालचक्र युवाचे आयोजन - टॉप न्यूज मराठी

तालवाद्यांचा एक महत्त्वाचा महोत्सव म्हणून गेली अनेक वर्षे देशभरात नावारूपास आलेल्या तालचक्र महोत्सवा अंतर्गत येत्या शनिवार दि. ९ आणि रविवार दि. १० ऑक्टोबर दरम्यान तालचक्र युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती महोत्सवाचे आयोजक आणि प्रसिद्ध तबलावादक पद्मश्री पं. विजय घाटे यांनी कळविली आहे.

शास्त्रीय संगीत आणि नृत्याची समृद्ध परंपरा जपणाऱ्या नवोदित व प्रज्ञावंत तरुण कलाकारांचे कलागुण रसिकांसमोर मांडणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश असून दोन्ही दिवशी शिवाजीनगर येथील बीएमसीसी रस्त्यावरील आघरकर संशोधन केंद्राशेजारील सारथी सभागृहात सायं ६ ते रात्री १० वाजे दरम्यान सदर महोत्सव संपन्न होईल. महोत्सव सर्वांसाठी विनामूल्य खुला असून त्यासाठी प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर प्रवेश देण्यात येईल अशी माहिती आयोजकांच्या वतीने कळविण्यात आली आहे. महोत्सवासाठी पुनीत बालन समूहाचे विशेष सहकार्य लाभले आहे.

महोत्सवाची सुरुवात ९ ऑक्टोबर रोजी बनारस घराण्याच्या युवा कलाकार आणि सीसीआरटी शिष्यवृत्ती प्राप्त कलाकर श्रीजा बिश्वास यांच्या एकल कथक नृत्यप्रस्तुतीने होईल. त्यांना शंकर मिश्रा (तबला व पढंत), संतोष मिश्रा (गायन व संवादिनी) आणि कल्याणी देशपांडे (सतार) अशी साथसंगत असेल. यानंतर सेनिया मैहेर घराण्याचे प्रसिद्ध सरोद वादक पं. तेजेंद्र नारायण मजुमदार यांचे शिष्य व सुपुत्र असलेल्या इंद्रायुध मजुमदार यांचे सरोद वादन रंगेल. यावेळी अजिंक्य जोशी हे तबलासाथ करतील.

महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाची (१० ऑक्टोबर) सुरुवात प्रसिद्ध तबलावादक पं. रामदास पळसुले यांचे शिष्य असलेल्या हेमंत जोशी यांच्या एकल तबलावादनाने होईल. हेमंत यांना यश खडके हे संवादिनीवर साथसंगत करतील. युवा तालचक्र महोत्सवाचा समारोप उस्ताद बिस्मिल्लाह खान युवा पुरस्कार २०२५ चे पुरस्कार्थी हिमांशू दरमोडा यांच्या गझल गायनाने होईल. त्यांना मिलिंद कुलकर्णी (संवादिनी) आणि निशित गंगानी (तबला) यांची साथसंगत असेल.