​मित्र फाऊंडेशनतर्फे पं. आनंद बदामीकर यांना फाऊंडेशनचा जीवनगौरव पुरस्कार प्रदान - टॉप न्यूज मराठी

विलंबित ख्यालाच्या धीरगंभीर स्वरातील पारंपरिक बंदिशी, द्रुत लयीतील आक्रमक, जोरकस तानांचा वर्षाव, आश्चर्यचकित करणारी लयकारी, नेमकेपणाने सम गाठण्याचे कौशल्य आणि तालाशी चाललेली सहजसुंदर क्रीडा...दमदार, बुलंद आवाजातील ख्यालगायन, ठुमरीतील नजाकत आणि आर्तता, होरीची रंगबहार, नाट्यपदांचा गोडवा आणि संतवाणीतील भक्तिभाव..असे अतिसुरेल रसायन ज्यांच्या गायकीत जमून आले होते, त्या भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांच्या सांगीतिक कर्तृत्त्वाचा दृकश्राव्य आढावा घेणारी स्वराधिराज ही चित्रफीत रविवारी रसिकांना अंतर्मुख करणारी ठरली.

निमित्त होते मित्र फाऊंडेशन आणि कावेरी कलाक्षेत्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वराधिराज या चित्रफितीच्या प्रदर्शनाचे आणि फाऊंडेशनतर्फे देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ कलाकाराच्या जीवनगौरव पुरस्कार प्रदानाचे. ज्येष्ठ तबलावादक पं. आनंद बदामीकर यांना कन्नड संघाच्या सचिव मालती कलमाडी यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. २५ हजार रुपये आणि भेटवस्तू, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी मित्र फाऊंडेशनचे धनंजय गोखले उपस्थित होते. एरंडवणा येथील शकुंतला शेट्टी सभागृहात हा कार्यक्रम झाला. याप्रसंगी ज्येष्ठ गायक पं. सुहास व्यास, पं. उल्हास कशाळकर, पं. उदय भवाळकर, पं. रघुनंदन पणशीकर, पं. संजीव अभ्यंकर, पं. आनंद भाटे, पं. भरत कामत, बापू देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पं. बदामीकर यांनी पं. भीमसेनजी यांच्या आठवणींना उजाळा दिला. "मी आज भरून पावलो. हा सन्मान मातापिता, गुरुजनांमुळे आहे", असे सांगत त्यांनी गणेश परण ऐकवले. भीमसेनजी मोठ्या आणि उदार मनाचे होते. त्यांच्यासोबत मी अनेक मैफिलींना साथ केली आहे. त्यांना भारतरत्न सन्मान मिळाल्यानंतर आवर्जून घरी भेटलो आणि खूप गप्पा झालेल्या आठवतात, असे ते म्हणाले.

स्वराधिराज ही चित्रफीत ज्येष्ठ वैद्यकीयतज्ज्ञ आणि भीमसेनजींचे दीर्घकालीन सहकारी व आर्य संगीत प्रसारक मंडळाचे सचिव डाॅ. एस. व्ही. गोखले यांच्या संकल्पनेतून साकारली आहे. डाॅ. गोखले यांच्या वैयक्तिक संग्रहातील दुर्मिळ ध्वनिमुद्रणे, चित्रफिती, छायाचित्रे तसेच भीमसेनजींशी वेळोवेळी झालेला प्रत्यक्ष संवाद यांचा स्वराधिराज चित्रफितीत समावेश आहे.

बी. जे. मेडिकलच्या आर्ट सर्कलचा प्रारंभ १९५३ मध्ये भीमसेनजींच्या गायनानेच झाला होता. तो परिचय वाढत गेला आणि मग कौटुंबिक स्नेहबंध जुळले. डाॅ. गोखले यांच्या घरी भीमसेनजींच्या अनेक मैफिली रंगल्या. त्यांचेही ध्वनिमुद्रण या चित्रफितीत आहे. १९५३ मधील ध्वनिमुद्रणापासून ते २०११ पर्यंतच्या कालावधीत भीमसेनजींचे गाणे कसे बहरत गेले, त्यात कसे व कोणते बदल होत गेले, याचेही दर्शन स्वराधिराज चित्रफितीत घडले. आसावरी तोडी, मिया की तोडी, मुलतानी, नाट्यपदे, ठुमरी, होरी, अभंगवाणी, पूर्वा कल्याण, दरबारी कानडा, ललत भटियार, अभोगी आणि जोगिया...अशा विविध रागांतील भीमसेनजींचा बुलंद स्वर संपूर्ण चित्रफितीत तळपत राहिला. चित्रफितीच्या अखेरीस जोगियामधील पिया मिलन की आस या रचनेतील भावोत्कट आर्तता रसिकांचे नेत्र ओलावणारी होती. शिवानी गोखले यांनी सूत्रसंचालन केले.