रंजक रोचक : जगात अनेक रहस्यमय ठिकाणे आहेत, पण जपानमध्ये एक असे गाव आहे जिथे गेल्यावर क्षणभर तुम्हाला वाटेल की तुम्ही एखाद्या भयपटात आला आहात. या गावात रस्त्यावर, शाळेत, बस स्टॉपवर, शेतात जिथे पाहाल तिथे फक्त बाहुल्याच दिसतील.माणसे कमी आणि बाहुल्या जास्त आहेत. या गावाचे नाव आहे नागोरो...
नागोरो हे जपानच्या शिकोकू बेटावरील एक छोटेसे गाव आहे. एकेकाळी हे गाव अगदी सामान्य होते. येथे शेकडो कुटुंबे आनंदाने राहत होती. पण हळूहळू तरुण नोकरीच्या शोधात शहरात जाऊ लागले आणि गाव रिकामे होऊ लागले.
गावातील शेवटच्या काही लोकांपैकी एक होत्या सुकिमी आयानो. वयाच्या 65 व्या वर्षी त्या आपल्या वडिलांची काळजी घेण्यासाठी पुन्हा गावात आल्या. गावात आल्यावर त्यांना प्रचंड एकटेपणा जाणवू लागला. शेतात काम करायला कोणी नाही, बोलायला कोणी नाही. मग त्यांनी एका कल्पनेतून आपला एकटेपणा दूर करण्याचा प्रयत्न केला.
सुकिमी यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. शेतात काम करणारे वडील आता दिसत नव्हते. त्यांची आठवण म्हणून सुकिमी यांनी वडिलांसारखी हुबेहूब दिसणारी एक बाहुली बनवली आणि तिला शेतात आणून ठेवले. ती बाहुली पाहून त्यांना थोडे बरे वाटले. मग त्यांनी गाव सोडून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी एक एक बाहुली बनवायला सुरुवात केली. जो जिथे काम करायचा, तिथेच त्याची बाहुली. शाळेत गेलेल्या मुलांसाठी शाळेच्या बेंचवर बसलेल्या बाहुल्या, बसची वाट पाहणाऱ्या म्हाताऱ्या आजीसाठी बस स्टॉपवर बाहुली, बाजारात भाजी विकणाऱ्या महिलेसाठी तिची बाहुली.
आज या गावात 27 जिवंत माणसे आहेत आणि 350 हून अधिक बाहुल्या आहेत. म्हणजे माणसांच्या 10 पट जास्त बाहुल्या.
या गावात तुम्ही प्रवेश करताच तुम्हाला रस्त्याच्या कडेला शेतात काम करणारे शेतकरी दिसतील, पण जवळ गेल्यावर कळेल की ते खरे शेतकरी नाहीत तर बाहुल्या आहेत. बंद पडलेल्या शाळेत 12 विद्यार्थी आणि 2 शिक्षक बसलेले दिसतील, पण ते सर्व बाहुल्या आहेत. त्या शाळेत आज एकही जिवंत मूल शिकत नाही. या बाहुल्यांचे डोळे, केस, कपडे इतके खरे वाटतात की रात्रीच्या वेळी पाहिले तर अंगावर काटा येतो. अनेक पर्यटक सांगतात की रात्री या बाहुल्या आपली जागा बदलतात, त्यांचे आवाज ऐकू येतात. अर्थात हे फक्त भीतीमुळे वाटते, पण दिवसासुद्धा या गावात एक विचित्र शांतता असते.
सुकिमी आयानो यांनी सांगितले की मी या बाहुल्या कोणाला घाबरवण्यासाठी बनवल्या नाहीत. माझे गाव मरत होते, मला ते जिवंत ठेवायचे होते. ज्या लोकांनी हे गाव सोडले, त्यांच्या आठवणी मी या बाहुल्यांच्या रूपात जपून ठेवल्या आहेत. प्रत्येक बाहुलीचा चेहरा गावातील एका खऱ्या व्यक्तीसारखा आहे.
आज हे गाव जपानचे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनले आहे. जगभरातून लोक या बाहुल्यांचे गाव पाहण्यासाठी येतात. पण सुकिमी म्हणतात की पर्यटकांनी यावे पण त्यांनी बाहुल्यांना हात लावू नये, कारण प्रत्येक बाहुलीत माझ्या गावातील एका माणसाचा आत्मा आहे. हे गाव भुताटकी नाही तर केवळ माणसाच्या भावना बाहुलीच्या रूपात तयार होऊन सामान्य पेक्षा वेगळे आहे एवढेच !