पर्यटन : अजिंठा वेरूळ लेणी ! दगडात कोरलेला महाराष्ट्राचा वैभवशाली इतिहास, पुण्यातून कसे जाल ? संपूर्ण ट्रॅव्हल गाईड - टॉप न्यूज मराठी

पर्यटन : महाराष्ट्राच्या कुशीत असे काही अद्भुत आश्चर्य दडले आहेत जे पाहिल्याशिवाय आपल्या संस्कृतीची महानता कळणार नाही. त्यापैकीच एक म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा आणि वेरूळची लेणी. युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिलेल्या या लेण्या म्हणजे मानवी कलेचा आणि श्रद्धेचा अप्रतिम संगम आहे. एकदा तरी आयुष्यात या लेण्यांना भेट द्यायलाच हवी.

भौगोलिक आणि ऐतिहासिक महत्व

अजिंठा आणि वेरूळ या दोन्ही लेण्या जरी एकत्र घेतल्या जात असल्या तरी त्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि त्यांच्यात सुमारे 100 किलोमीटरचे अंतर आहे. अजिंठा लेणी ही वाघोरा नदीच्या काठावर, घोड्याच्या नालाच्या आकाराच्या डोंगरात कोरलेली आहे. येथे एकूण 30 लेण्या आहेत. या लेण्यांचा काळ इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इसवी सन सहाव्या शतकापर्यंतचा मानला जातो. ही सर्व लेणी बौद्ध धर्माशी संबंधित आहेत. येथे हीनयान आणि महायान पंथाच्या लेण्या पाहायला मिळतात. अजिंठा लेणी त्यांच्या अप्रतिम भित्तीचित्रांसाठी जगप्रसिद्ध आहे. नैसर्गिक रंगांपासून बनवलेली ही चित्रे आजही जशीच्या तशी आहेत, हे एक मोठे आश्चर्य आहे.

वेरूळ लेणी, जिला इंग्रजीत एलोरा म्हणतात, ती छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या 30 किलोमीटरवर आहे. येथे एकूण 34 लेण्या आहेत. वेरूळचे वैशिष्ट्य म्हणजे येथे एकाच ठिकाणी तीन धर्मांचा संगम पाहायला मिळतो. 1 ते 12 लेण्या बौद्ध धर्माच्या, 13 ते 29 हिंदू धर्माच्या आणि 30 ते 34 जैन धर्माच्या आहेत. येथील मुख्य आकर्षण म्हणजे लेणी क्रमांक 16 मधील कैलास मंदिर. एकाच अखंड दगडात वरपासून खालपर्यंत कोरलेले हे मंदिर जगातील सर्वात मोठे एकाश्म शिल्प आहे. हे राष्ट्रकूट राजा कृष्ण प्रथम याने आठव्या शतकात बांधले आहे.

पुण्यातून कसे जायचे - प्रवास मार्ग आणि वाहतूक सुविधा

पुण्यातून अजिंठा वेरूळला जाण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत.

1. रस्ते मार्गे - पुण्यापासून छत्रपती संभाजीनगर हे अंतर सुमारे 260 किलोमीटर आहे.

- स्वतःची गाडी - पुणे - अहिल्यानगर - छत्रपती संभाजीनगर या महामार्गाने तुम्ही 5 ते 6 तासात पोहोचू शकता. रस्ता चांगला आहे.

- एसटी बस - पुण्यातील शिवाजीनगर आणि स्वारगेट बस स्थानकावरून छत्रपती संभाजीनगरसाठी दर तासाला सरकारी आणि खाजगी बसेस सुटतात. रातराणी आणि शिवशाही बसेस उपलब्ध आहेत. तिकीट सुमारे 600 ते 900 रुपये आहे.

- पहिले वेरूळ करा - पुण्यातून निघाल्यावर आधी वेरूळ लागते. संभाजीनगरच्या आधी 30 किमी. वेरूळ पाहून संभाजीनगरला मुक्काम करून दुसऱ्या दिवशी अजिंठाला जाता येते. अजिंठा हे संभाजीनगरपासून 100 किमी आहे.

2. रेल्वे मार्गे - पुण्यातून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट रेल्वे आहे. पुणे - नांदेड एक्स्प्रेस, पुणे - अमरावती एक्स्प्रेस दररोज आहे. 6 ते 7 तास प्रवास आहे. रेल्वेने जाणे अधिक आरामदायक आणि स्वस्त आहे. स्लीपरचे तिकीट 300 रुपयांपासून सुरू होते.

3. विमान मार्गे - पुण्यातून छत्रपती संभाजीनगरसाठी थेट विमान सेवा आहे. अवघ्या एका तासात तुम्ही संभाजीनगरला पोहोचता. विमानतळापासून वेरूळ 35 किमी आहे, त्यासाठी कॅब मिळते.

तिथे काय पाहायचे

वेरूळ येथे -

- कैलास लेणे - जगातील सर्वात मोठे एकाश्म मंदिर, शिवपार्वती, रावणाने कैलास पर्वत उचलल्याचे शिल्प

- दशावतार लेणे - विष्णूच्या दहा अवतारांचे शिल्प

- विश्वकर्मा लेणे - बौद्ध चैत्यगृह, जिथे अप्रतिम कोरीवकाम आहे

अजिंठा येथे -

- लेणी क्रमांक 1 मधील बोधिसत्व पद्मपाणीचे चित्र - हे अजिंठाचे सर्वात प्रसिद्ध चित्र आहे, ज्यात करुणा आणि शांती दिसते

- लेणी क्रमांक 17 मधील जातक कथा - भगवान बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कथा चित्रांतून मांडल्या आहेत

- लेणी क्रमांक 26 मधील महापरिनिर्वाण शिल्प - बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे भव्य शिल्प

अजिंठा वेरूळ ही फक्त पर्यटन स्थळे नाहीत तर ती आपली सांस्कृतिक ओळख आहेत. ज्या काळात कोणतीही आधुनिक हत्यारे नव्हती, त्या काळात केवळ छन्नी हातोड्याने डोंगर पोखरून एवढी भव्य शिल्पे आणि चित्रे कशी काय बनवली असतील हा प्रश्न मनाला पडतो. येथील प्रत्येक दगडात इतिहास बोलतो. येथील शांतता, भव्यता आणि कलाकुसर मनाला एक वेगळीच अनुभूती देते. मुलांना इतिहास समजून सांगण्यासाठी यापेक्षा चांगली शाळा नाही.

काही महत्वाच्या टिप्स

- लेणी पाहण्यासाठी सोमवारचा दिवस टाळा, अजिंठा सोमवारी बंद असते, वेरूळ मंगळवारी बंद असते.

- सकाळी लवकर लेणी पाहायला सुरुवात करा, कारण दुपारच्या उन्हात दगड तापतो.

- अजिंठ्याला जाण्यासाठी मुख्य प्रवेशद्वारापासून 4 किमी चालावे लागते किंवा शटल बस घ्यावी लागते.

- सोबत पाणी आणि टोपी नक्की ठेवा.

- गाईड घेतल्यास इतिहास अधिक चांगल्या प्रकारे समजेल, गाईडचे शुल्क 1000 ते 1500 रुपये आहे.

या लेण्यांची भव्यता पाहण्यासाठी एकदा अवश्य या लेण्यांना भेट द्यावी. या लेण्यांना पाहतांना तेथील गूढ शांतता मनाच्या आत खोल घर करते.