लोणावळा - घरातील परवानाधारक रायफल साफ करत असताना अचानक गोळी सुटून एका 33 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. लोणावळ्यातील भुशी गावातील प्रसिद्ध हॉटेल मोतीराम येथे ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण भुशी गाव आणि लोणावळा परिसरात शोककळा पसरली आहे.
अभय माणिक मराठे वय 33 असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. लोणावळा शहराचे माजी नगरसेवक आणि हॉटेल व्यावसायिक माणिक मराठे यांचे ते पुत्र होते. अभय माणिक मराठे हे व्यवसायाने वकील होते.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अभय मराठे हे हॉटेलच्या आवारात त्यांच्या वडिलांच्या मालकीची परवानाधारक रायफल साफ करत होते. रायफल साफ करत असताना अचानक ट्रिगर दाबला गेल्याने त्यातून थेट गोळी सुटून थेट अभयच्या छातीत घुसली. गोळीचा आवाज होताच अभय रक्ताच्या थारोळ्यात पडला.
बंदुकीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी आणि परिसरातील लोकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी तातडीने अभयला अत्यंत गंभीर अवस्थेत उपचारासाठी लोणावळ्यातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, गोळी छातीत खोलवर लागल्याने उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली. पोलिसांनी आकस्मिक मृत्यू म्हणून या घटनेची नोंद केली आहे. रायफल मधून गोळी कशी सुटली, घटना कशी घडली, या घटनेमागील नेमके कारण काय याचा पोलीस शोध घेत आहेत. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.